रब्बी हंगामातील बटाटा वाणाच्या मागणीत घट

बटाट्यास चांगला भाव मिळत असूनही मंचर बाजार समितीत रब्बी हंगामातील बटाटा वाणाच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. प्रतिक्विंटल 3 हजार ते 3 हजार 500 असा भाव बटाटा वाणाला आहे. मात्र, त्याला अपेक्षित मागणी नाही.

देशात सर्व बाजारपेठेत बटाट्यास चांगला भाव मिळत असूनही व यंदा राज्यात भरपूर पाऊस होऊनही बटाटा वाणाच्या मागणीत गत तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिसून येत आहे.

यावर्षी पुणे जिल्ह्यात बटाटा हंगाम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. इतर ठिकाणच्या बटाटा उत्पादकांपेक्षा येथील बटाट्यास जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने, लवकर बटाटा लागवड करून राज्यातील व देशातील इतर भागातील लागवडीच्या आधी आपलेच बटाटा पीक बाजारात आणण्यासाठी हंगामपूर्व बटाटा लागवड गेल्या काही वर्षांत येथे वाढली आहे. त्यामुळे बेभरवशाच्या वातावरणात हवामान बदलाचा धोका पत्करून या कालावधीतउत्पादन कमी येत असूनही या भागात बटाटा लागवडीकडे तरुण शेतकऱ्यांचा कल उत्तर पुणे जिल्ह्यात वाढला आहे.

वीस-पंचवीस वर्षांपासून सुधारित जातीचे पुखराज बटाटा वाण सर्वत्र वापरले जात आहे. कारण हा वाण कमी दिवसांत तयार होऊन इतर वाणांपेक्षा भरपूर उत्पन्न येते. यावर्षी भारतात कांद्याप्रमाणे बटाटा भाव वाढल्याने बटाटा वाणाचे दर जास्त आहेत व बटाटा लागवडीच्या भांडवलावर मोठा खर्च होणार असल्याने शेतकऱ्यांची उत्सुकता कमी आहे. मान्सून लांबल्याने तसेच परतीचा पाऊस अद्यापि पडत असल्याने बटाट्याच्या नंतर कांदा पीक व किंवा इतर पिकांना उशीर होईल. या सर्व कारणांमुळे राज्यात प्रसिद्धअसलेल्या बटाटा वाणाच्या सर्वात मोठ्या मंचर बाजार पेठेत अतिशय कमी मागणी आहे. इंदूर परिसरात अर्ली हंगामात लावलेला बटाटा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नष्ट झाल्याने बटाटा उत्पादन घटले आहे व खरीप हंगामातील शेतकरी अडचणीत आहेत व रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील आतापर्यंतची आगाद बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात घटल्याने संपूर्ण देशात नवा बटाटा बाजारात येण्यास मोठा गॅप तयार होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील अल्पप्रमाणात लागवड झालेल्या बटाटा उत्पादकांना चांगला भाव मिळण्याची शक्यता वरील परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे. अशी माहिती व्यापारी राजेंद्र भंडारी यांनी दिली.