बिबट्याचे हल्ले टाळण्यासाठी वन विभागाच्या उपाययोजना

वन्यप्राणी बिबट हल्ला टाळण्यासाठी अतिसंवेदनशील भागातील ग्रामस्थ, शेतकरी, मजूर यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुका परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यांचा जुन्नर वन विभागात समावेश होतो. अतिसंवेदनशील भागांमध्ये नागरिकांनी शेतात काम करताना एकट्याने न जाता समूहाने तसेच आवाज करत सावधानतापूर्वक कामे करावीत. लहान मुले, वृद्धांना घराच्या बाहेर एकटे सोडू नये तसेच घराबाहेर उघड्यावर झोपू नये, शेतातील एकटी घरे व गोठा याभोवती सौरऊर्जा कुंपण करून घ्यावे, दिवस उगवण्यापूर्वी व दिवस मावळल्यानंतर शक्यतो घराबाहेर पडू नये, अपरिहार्य असल्यास सोबत विजेरी (टॉर्च) व मोठी काठी बाळगावी. घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे प्रकाशदिवे लावावेत, अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत.

बिबट्यांच्या नसबंदीबाबतचा तसेच जास्तीच्या 75 बिबट्यांचे दूरच्या अभयारण्यात स्थलांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. अतिसंवेदनशील भागांमध्ये बिबट्यांमुळे सतत उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक तरुणांच्या सहभागातून बिबट कृती दलाचे चार बेस कॅम्प निर्माण केले आहेत.

जुन्नर वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए.आय.) या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना वन्यप्राणी बिबट मनुष्यवस्तीजवळ आल्याची माहिती देणारी प्रणाली विकसित केली आहे. विद्या प्रतिष्ठान बारामती व सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या मदतीने शेतात काम करणाऱ्या माणसांच्या सुरक्षेसाठी मानेला लावण्याचा विशिष्ट प्रकारचा काटेरी पट्टा (नेक बेल्ट) विकसित करण्यात आला आहे. तसेच मेंढपाळ वर्गासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने तंबू (टेन्ट) पुरविण्यात येत आहेत. जुन्नर वन विभागांतर्गत वन्यप्राणी बचाव दलाचे बळकटीकरण करण्यात आले असल्याचे वन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.