>> उदय पिंगळे
सणांमागील धार्मिक बाजू जपत श्रद्धा, परंपरेचे पालन करीत सणांचा नवा अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करतो. आपली हौस भागवण्याच्या उत्साहामुळे खरेदीविक्री व्यवहारालाही तेजी येते. मोठय़ा सणांच्या काळात अनेक किरकोळ दुकानदार खरेदीस प्रोत्साहन म्हणून बिलात सूट आणि मोफत भेटवस्तू देत असतात. रिटेल क्षेत्रात घट्ट पाय रोवलेले अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स रिटेल वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स घेऊन येतात. त्यामुळेच सण आणि उत्सव ही आपल्या अर्थव्यवस्थेची बलस्थाने आहेत.
सण, उत्सव यांचे अस्तित्व प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि आदिम समाजापासून अतिशय आधुनिक समाजापर्यंत जगभरात सर्व ठिकाणी आहे. पाश्चात्य देशात काही मोजकेच सण साजरे केले जातात. सण आणि उत्सव हे शब्द आपण सारख्याच अर्थाने वापरत असलो तरी त्यात सूक्ष्म फरक आहे. सण हा शब्द मूळ संस्कृत क्षण या शब्दावरून आला आहे. प्रत्येक सण हा उत्सव होऊ शकतो, पण सर्व उत्सवांना सण म्हणत नाहीत. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रयाग येथे मकर मेळा आणि कुंभ मेळा एक महिनाभर भरत असतो. तो गंगा-यमुनांच्या संगमांचा उत्सव असतो, तो सण नव्हे. उत्सव म्हणजे सामुदायिक पूजा. ज्या पूजेत सामुदायिक रीतीने उपवास, पूजेनंतर भोजन, नृत्य, गायन, भजन, कीर्तन, मैदानी खेळ या किंवा यापैकी काही गोष्टी चालतात. त्यात लोक उत्साहाने भाग घेतात ती सामुदायिक पूजा. बरेचसे सण आणि उत्सव वर्षातून एकदा येतात. काही वर्षापेक्षा अधिक अवधीने येतात. काही सण वा उत्सव कौटुंबिक, काही विशिष्ट कुळ, जात, जमात, धर्म, राष्ट्र यापुरते मर्यादित असतात तर काही आंतरराष्ट्रीय असतात. सण उत्सव यांचा विशिष्ट दिवस अथवा कालखंड ठरलेला असतो. गणेशोत्सव दहा दिवस, नवरात्र, दसरा मिळून दहा दिवस, दिवाळी पाच दिवस इत्यादी. हीच गोष्ट जगातील सर्व धर्मातील आणि राष्ट्रातील सण उत्सवांना लागू आहे. जगातील बहुतेक राष्ट्रांमध्ये वर्षाची सुरुवात ही सणाने सुरू होते. सण आणि उत्सवांना धार्मिक आणि लौकिक बाजू आहेत, त्या पुराण कथांशी अथवा मिथकांशी संबंधित असतात. जगरहाटीमागे दिव्य, अद्भुत अशा काही शक्ती असून त्याच संकटे आणतात आणि त्यांचे निवारण करतात. याच भावनेने देव, असुर, पितर यांच्या प्रीत्यर्थ सण उत्सव साजरे केले जातात. त्यात काहींमध्ये उपासना पूजेला प्राधान्य दिले जाते तर काहीत धार्मिकतेचा भाग अत्यल्प असतो. अस्तित्वात असलेल्या काही धार्मिक उत्सवांचे धार्मिक स्वरूप आता पूर्णतः नाहीसे होऊन त्यांना केवळ लौकिक रूप प्राप्त झाले आहे.
आपली संस्कृती ही प्राचीन असून ती प्रामुख्याने शेतीवर आधारित होती. त्यामुळे आपले बहुतेक सणांचा संबंध हा शेती, पशुपक्षी, निसर्ग अशा सजीव-निर्जीव यांच्याशी संबंधित आहे. लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात शेती संबंधित फारशा सुधारणा न झाल्याने ती किफायतशीर ठरत नाही. त्याचबरोबर अर्थार्जनाचे विविध पर्याय निर्माण झाल्याने लोकांकडे पैसा आला. त्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढली. आता शेतीला दुय्यम स्थान मिळाल्याने सणातील कृषिप्रधानता हळूहळू नष्ट होत आहे. असे असले तरी आपण सर्वचजण उत्सवप्रिय आहोत. देशात विविध प्रकारचे 51 सण उत्सव साजरे केले जातात. त्यातील 17 देशभरात साजरे होतात. संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवण्याचा त्यात प्रयत्न असतो. एखाद्या समूहाचे, संस्कृतीचे सोप्या भाषेत वर्णन करायचे झाल्यास त्या समूहातील लोकांचे वर्तन, मूल्य आणि वृत्ती यांचे अनौपचारिक संयोजन. बाजारात तेजी मंदी काहीही असो, धुमधडाक्यात सण साजरे करण्याचे आपण सोडत नाही. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे बहुतेक सणांमागे धार्मिक बाजू आहे. जिथे बहुसंख्य लोक कुणावर तरी श्रद्धा ठेवतात, परंपरेचे पालन करताना त्यांचा नवा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आपली हौस भागवण्याच्या नादात आपण अति उपभोगाकडे जात आहोत याचा फारसा कोणी विचार करत नाही. याच मनोवृत्तीस हेरून मोठय़ा सणांच्या काळात अनेक किरकोळ दुकानदार खरेदीस प्रोत्साहन म्हणून बिलात सूट आणि मोफत भेटवस्तू देत असतात. रिटेल क्षेत्रात घट्ट पाय रोवलेले अमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स रिटेल वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स घेऊन येतात. अनेकजण त्याची वाट पाहात असतात. त्यामुळेच सण आणि उत्सव ही आपल्या अर्थव्यवस्थेची बलस्थाने आहेत.
बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात चैत्र महिन्यातील गुढीपाडवा ते फाल्गुन महिन्यातील होळीपर्यंत वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यातील गुढीपाडवा, दसरा, दिवाळी हे सण देशभर सर्वत्र साजरे केले जातात. दिवाळीनंतर येणाऱ्या तुळशी विवाहानंतर नवीन विवाह संपन्न होतात. दरवर्षी एक कोटी विवाह होत असून या वर्षी पस्तीस लाख विवाह नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांत होतील. यामध्ये एकूण 4.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. सर्वाधिक उलाढाल होणारे हे क्षेत्र असून त्यामुळे अनेक लोक कर्जबाजारी होतात. या काळात सेवा, व्यापार आणि वस्त्राsद्योग मोठी वाढ होते. याशिवाय जैन, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी, ज्यू, मुस्लिम यासारख्या अन्य धर्माचे लोकही त्यांचे सण उत्साहाने साजरे करत असतात. धर्म कोणताही असो सर्वजण एकमेकांच्या सणाचा आनंद लुटतात, या साऱ्यांचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम असे-
किरकोळ वस्तूच्या मागणीत वाढः दिवाळी, ईद, ख्रिसमस या सणांमध्ये मिठाई, भेटवस्तू यांची देवाणघेवाण होते. कपडे खरेदी केले जातात, घरांना रंग लावून आकर्षक सजावट केली जाते. त्यामुळे या वस्तूंची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते. अलीकडे सोन्यावरील आयात शुल्क पंधरा टक्क्यावरून सहा टक्क्यावर आणल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे.
कृषी उत्पादनांच्या मागणीत वाढः बहुतेक सण हे शेतीशी संबंधित असल्याने सणासुदीला तेव्हा सहज उपलब्ध ऋतूनुसार असलेल्या कृषीमालाचा वापर केला जात असल्याने संबंधित कृषी उत्पादनांच्या मागणीत वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खेळता पैसा येतो. यातील काही भागाची ते स्वतसाठी खरेदी करीत असल्यानेही सर्वसाधारण मागणीत वाढ होते.
रोजगार निर्मितीः सणासुदीच्या निमित्ताने मागणीत होणाऱ्या वाढीचा पुरवठा करण्यास अनेक कारागीर आणि मध्यस्थांची गरज लागते. त्यामुळे असे काम करण्यास उत्सुक व्यक्तींना तात्पुरता रोजगार मिळतो. विषेशत ग्रामीण भागातील लोकांना त्याचा विशेष लाभ होतो.
पर्यटन व्यवसायात वाढः काही विशेष सण उत्सव यामध्ये काही देशी विदेशी व्यक्तींना विशेष रुची असते, त्यामुळे लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. यामुळे वाहतूक, आतिथ्य याबरोबर स्थानिक व्यवसायांची वाढ होते. कुंभ मेळा, दुर्गापूजा, मकर संक्रांतीस साजरा केला जाणारा पतंगोत्सव यासारख्या सणामध्ये पर्यटन संबंधित व्यवसायात मोठी वाढ दिसते.
सांस्कृतिक अर्थव्यवस्थेस चालनाः या सणात हस्तकला, नृत्य, क्रीडाप्रकार, खाद्यपदार्थ यातून सांस्कृतिक प्रदर्शन होत असल्याने सांस्कृतिक अर्थव्यवस्थेस चालना मिळते.
उत्पादनात आणि उलाढालीत वाढः या काळात उत्सवाशी संबंधित सजावट सामान, फटाके यांची मागणी वाढल्याने उत्पादन वाढवावे लागते. त्यामुळे उत्पादक स्थानिक वितरक यांना विशेष फायदा होतो. उलाढालीच्या दृष्टीने पाहिल्यास रक्षाबंधन 5000 कोटी, गणेशोत्सव 20000 कोटी, ईद 15000 कोटी, नवरात्र उत्सव 50000 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल खाली असून या दिवाळीत ती 80000 कोटीहून अधिक वाढण्याची शक्यता आहे.
पायाभूत सुविधांत वाढः सण उत्सवाच्या निमित्ताने वाहतूक, निवास यांची मागणी वाढल्याने पायाभूत सुविधांना चालना मिळते.
डिजिटल अर्थव्यवस्थेत वाढः या काळात अनेक वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होते. कोरोना कालखंडानंतर डिजिटल पेमेंट करणे लोकांना सोयीचे वाटते, त्यामुळे अनेकांना विशेषत तरुणांना हा पर्याय सोयीचा वाटत असल्याने ई-कॉमर्सची वाढ होत असून त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेत आपोआपच वाढ होत आहे. एका अंदाजानुसार आता अर्ध्याहून अधिक व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत असून अजून दहा वर्षांत त्यांचे प्रमाण पंच्याण्णव टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे.
स्थानिक व्यवसायात वाढः अनेक वस्तू सेवा स्थानिक पातळीवर भागवल्या जातात. यातील बऱ्याचशा गरजा लघु आणि मध्यम व्यावसायिकांकडून पूर्ण केल्या जात असल्याने स्थानिक व्यवसायात वाढ होते.
एकात्मतेत वाढः या निमित्ताने प्रत्यक्षात गाठीभेटी होत असल्याने यासाठी स्थानिक व्यावसायिकांची मदत घेतली जात असल्याने व्यक्ती व्यक्तींमधील आदानप्रदान वाढीस लागते. त्यामुळे एकात्मतेत वाढ होते.
आपण मूलत निसर्गपूजक आहोत त्यामुळेच आपले सण बहुतेक सण साजरे करण्याच्या उद्देश एकत्रित येऊन निसर्गपूजा करावी, त्यातून मानसिक प्रसन्नता लाभावी, आनंद मिळावा, समृद्धी लाभावी असा असावा. अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे ओरबाडून घेण्याच्या वाढत्या वृत्तीमुळे याचा लोप पावत असून आपण पर्यावरणाचा नाश करीत आहोत. पूर्वी क्वचितच साजरे केले जाणारे वाढदिवस आता सर्रास साजरे केले जातात. त्यातील 1, 5, 50, 60, 75, 84 आणि प्रसंगी 100वे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करण्याची प्रथा पडली आहे. त्याच जोडीला लग्नाचे वाढदिवसही साजरे केले जातात. याशिवाय 31 डिसेंबर, फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेन्टाइन डे असे विविध दिवस विशेष दिवस म्हणून साजरे करण्याचे आपण स्वीकारले आहे. यामुळे सणासुदीला मागील वर्षाच्या तुलनेत किरकोळ विक्रीत 20 ते 30 टक्के, ई-कॉमर्स 50-60 टक्के, आतिथ्य व्यवसाय 15 ते 25 टक्के, पर्यटन 10 ते 20 टक्के, जाहिरात 5 ते 15 टक्के अशी प्रचंड वाढ आपण अनुभवतो आहोत आणि आपली शाश्वत जीवनशैली, नैतिक मूल्ये हरवत चाललो आहोत.
लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)