मागोवा – काय असावं या हिंसेच्या मुळाशी?

>> आशा कबरे-मटाले

रस्त्यावरच्या क्षुल्लक वादावादीचं रूपांतर टोकाच्या हिंसेत होऊन एका तरुणाचा जीव जाण्याची घटना नुकतीच मुंबईत नोंदली गेली. या घटनेत त्या तरुणाच्या वृद्ध वडिलांनाही ज्या बेदरकारपणे त्या तरुणांनी मारहाण केली, ती पाहता ‘एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत’ याविषयी खरोखरीच चिंता वाटते.

मुंबईत मालाड पूर्व इथे गेल्या शनिवारी रस्त्यावरील वादावादीतून एका तरुणाला झालेल्या भीषण मारहाणीची व त्यातून तो मरण पावल्याची घटना एव्हाना बातम्या व सोशल मीडियावरील व्हिडीओवरून सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. पत्नीसह बाईकवरून चाललेल्या या तिशीच्या तरुणाची एका रिक्षाचालकाशी ‘कट मारण्या’वरून वादावादी झाली. वाद वाढताच रिक्षाचालकाने आपल्या नऊ-दहा मित्रांना तिथे बोलावून घेतले. त्या तरुणाचे आई-वडीलही पाठोपाठच अन्य रिक्षाने प्रवास करत होते. तेही तिथे पोहोचले. परंतु तोवर त्या तरुणाला पाठीत, पोटात खूप मारहाण केली गेली होती. त्याचा एकटय़ाचा त्यांच्यासमोर निभाव न लागल्याने तो खाली पडला असता त्याची आई त्याला वाचवण्यासाठी त्याच्यावर ओणवी झाली. वयोवृद्ध वडीलही हात जोडून ‘आता पुरे’च्या विनवण्या करत होते, तर त्या टोळक्याने किरकोळ प्रकृतीच्या त्या वृद्धाच्याही सटासट मुस्काटात लगावल्या. त्यांच्या डोक्यावरही मारले. आसपास बघ्यांची गर्दी जमली होती. त्यांनी शूट केलेल्या व्हिडीओतून हा सगळा भीषण मारहाणीचा प्रकार अनेकांपर्यंत पोहोचला आहे. अखेरीस बेशुद्धावस्थेतील त्या तरुणाला त्याच्या पत्नी आणि वडिलांनी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु काही तासांतच रात्री त्याचा मृत्यू झाला.

अशाच स्वरूपाची एक घटना त्याच दिवशी दिल्ली शहरातही घडली. दसऱयाशी संबंधित कार्पामातून बाईकवर परतणाऱया दोघा भावांवर बाईकवरूनच जाणाऱया अन्य तिघांनी हल्ला केला. या भावांनी त्या तिघांना बाईक नीट सांभाळून चालवण्याची सूचना केली होती. त्यावरून चिडलेल्या त्या तिघांनी त्यांना थेट चाकूने भोसकलेच. यात एका भावाच्या छातीवर, पोटावर वार केले गेल्याने त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी आहे.

रस्त्यावरील किरकोळ वादावादीचे रूपांतर हाणामारीत वा टोकाच्या हिंसेत होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात प्रचंड वाढले आहेत. इंग्रजीत अशा घटनांना ‘रोड रेज’ असं संबोधलं जातं. ‘रोड रेज’ म्हणजे रस्त्यावर वाहन चालवणाऱयांनी संतापातून केलेलं आाढमक वा हिंस्र वर्तन. यात एकमेकांना चिडून शिवीगाळ करण्यापासून संतापून गाडी वाईट पद्धतीने चालवणे, धमकावणे, मारहाण करणे, एकमेकांच्या वाहनांची मोडतोड करणे यांपासून ते अगदी जीव घेण्यापर्यंत प्रकरणे जाताना दिसतात. आपल्या देशात सर्व प्रमुख शहरांतून विशेषत: मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे इथे अशा घटना वरचेवर घडत असल्याचे व गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतही याचा उल्लेख केला होता. रस्त्यावरील अशा आाढमकतेचे व बेफाम ड्राइव्हिंगचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढत चालले आहे. 2019 मध्ये अशी 1 लाख 55 हजार प्रकरणे हिंसक घटनांत अनेकांचा बळी जात असल्याने व कित्येक जण जखमी होत असल्याने या प्रकारांविषयी चिंता वाढली आहे. एकप्रकारे या घटना समाजाच्या सद्यस्थितीचे दर्शनही घडवतात. किती किरकोळ कारणांवरून माणसे किती हिंस्त्र होऊ लागली आहेत हे तर त्यातून दिसतेच, पण या टोकाच्या संतापाच्या मुळाशी काय असावे याचा थोडासा विचार जरी केला तरी त्यामागे जवळपास सर्वच मोठय़ा शहरांमध्ये अगदी नित्याची झालेली वाहनकोंडी, प्रत्येकाला कुठेतरी पोहोचण्याची असलेली घाई, त्यातून येणारा पराकोटीचा ताण ही थेट कारणे जशी दिसतात, तशीच एकंदर समाजात वाढत चाललेले नैराश्य, प्रत्येकाच्या मनातला कोंडलेला ताणतणाव, सामाजिक विषमतेतून तसेच अन्य सामाजिक-राजकीय कारणांतून निर्माण होणारी परस्परांविषयीची चीड व द्वेषभावना, टोकाची अहंकारी वृत्ती अशी कारणेही दिसतात. या घटनांमध्ये आणखी एक घटक नेहमीच उपस्थित दिसतो, तो म्हणजे मदतीच्या दृष्टीने, वाद संपवण्याच्या दृष्टीने काहीही न करणारे, मधे न पडणारे ‘बघे.’ बघ्यांचा जमाव अशा हिंसक घटना घडत असताना मोबाइलमध्ये सगळं टिपण्याचं काम तेवढा करतो. ही अध्यात-मध्यात न पडण्याची वृत्ती वाढते आहे. पोलिसी कारवाई, पुढील कोर्टकचेरी तसेच उगाच दोघांच्या भांडणात आपला तिसऱयाचा बळी जायला नको या विचाराने बघणारे दूर राहतात. अशा घटनांचे व्हिडीओ मात्र सातत्याने व्हायरल होतात. मध्यंतरी असंच एक रील नजरेस पडलं होतं. एका सोसायटीच्या आवारात एक महागडी कार शिरते. पाठोपाठ एक जुनाट ओला टॅक्सीही. आवारातला चढ चढताना ओला टॅक्सीला वेग न आवरल्याने तशी हलकेच त्या महागडय़ा गाडीला येऊन टेकते. त्याबरोबर त्या महागडय़ा गाडीचा उंचापुरा मालक त्वेषाने दार उघडून बाहेर पडतो. मागे जाऊन आपल्या गाडीवर हात फिरवून पाहतो. ओला ड्रायव्हरही गाडीबाहेर पडतो. तो काही बोलणार इतक्यात हा दणकट माणूस त्याला उचलून उलटा करून दाणकन जमिनीवर आदळतो. ‘तो गेलाच असावा बहुतेक’ असं वाटावं इतक्या जोरात हे आदळणं असतं. इथे त्या ओला ड्राइव्हरविषयीची तुच्छता, ‘थांब आता तुलाच आदळतो’ ही वृत्ती अंगावर येते. शारीरिक, सामाजिक किंवा आर्थिक ताकद समोरच्या पेक्षा जास्त असलेले रस्त्यावर अशी दादागिरी करताना नेहमीच नजरेस पडतात. सुसंस्कृतपणाचा लवलेश नसणं आणि विधिनिषेधशून्यता या अशा वर्तनाच्या मागे दडलेली असावी. अशा हिंसक वर्तनाच्या माऱयातून ना वृद्ध बचावतात ना स्त्रिया.

या वर्तनाला अटकाव करण्यासाठी कायदा कठोर करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. यापूर्वी झालाही आहे, पण समाजाची मानसिकताच जर बिघडत चालली असेल तर निव्वळ कायदे कठोर करून काही उपयोग होईल का?

[email protected]