रणजी विजेत्या मुंबईला रणजी मोसमाच्या प्रारंभीच बडोद्याकडून पराभवाचा धक्का बसला होता; पण मुंबईने महाराष्ट्रविरुद्धच्या रणजी सामन्यात 17 वर्षीय आयुष म्हात्रेने फटकावलेल्या नाबाद 127 धावांच्या खेळीमुळे दिवसअखेर 3 बाद 220 अशी जबरदस्त मजल मारली. मुंबईच्या वेगवान माऱ्यापुढे महाराष्ट्राचा डाव अवघ्या 126 धावांतच आटोपल्यामुळे पहिल्याच दिवशी 94 धावांची आघाडी घेत महाआघाडीच्या दिशेने पावले टाकली आहेत.
शार्दुलची हॅटट्रिक हुकली
बडोद्याच्या खेळपट्टीवर मुंबईच्या फलंदाजांसह गोलंदाजांनाही सूर गवसला नव्हता. मात्र आज बीकेसीच्या खेळपट्टीवर मुंबईच्या गोलंदाजांनी कमालच केली. तीन वेगवान गोलंदाजांसह खेळणाऱ्या मुंबईच्या आक्रमणासमोर महाराष्ट्राचे काहीही चालले नाही. शार्दुल ठाकूरने सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाडला शून्यावर बाद करत सनसनाटी सुरुवात केली. मग पुढच्याच चेंडूवर सचिन धसलाही भोपळा फोडू दिला नाही. त्यानंतर शार्दुलला हॅटट्रिकची संधी होती, पण अंकित बावणेने शेवटचा चेंडू खेळून काढत हॅट्ट्रिक रोखली. पहिल्याच षटकात दोन हादरे बसल्यानंतर महाराष्ट्राच्या डावाला मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायसच्या माऱ्यानेही बधीर करून सोडले. या दोघांनीही अचूक मारा करत तासाभरातच त्यांची 6 बाद 59 अशी केविलवाणी अवस्था केली होती. तेव्हा उपाहारालाच महाराष्ट्राचा डाव संपण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण तेव्हा अझीम काझी (36) आणि निखिल नाईक (38) यांनी सातव्या विकेटसाठी 58 धावांची भागी रचत संघाला शतकापलीकडे नेले. मात्र ही जोडी फुटल्यानंतर शम्स मुलानीने हितेश वाळुंज (0), राजवर्धन हंगर्गेकर (0) आणि प्रदीप दाढे (1) यांच्या विकेट घेत महाराष्ट्राच्या पहिल्या डावाला 126 धावांवर पूर्णविराम लावला.
आयुषचे पहिलेवहिले शतक
इराणी करंडकात शेष हिंदुस्थानविरुद्ध पदार्पण करणाऱ्या 17 वर्षीय आयुष म्हात्रेने 19 आणि 14 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याला फारसे काही करता आले नव्हते. मात्र बडोद्याविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात त्याने 52 आणि 22 धावांची खेळी करून आपले अस्तित्व दाखवले होते. मात्र आज वेगळाच आयुष पाहायला मिळाला. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना त्याने महाराष्ट्राच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करत 17 चौकार आणि 3 षटकारांचा वर्षाव केला. पृथ्वी शॉ (1) आणि हार्दिक तामोरेने (4) निराशा केल्यानंतर आयुषने कर्णधार अजिंक्य रहाणेसह (31) तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागी रचत मुंबईची सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या (ना. 45) साथीने 97 धावांची नाबाद भागी रचत सामन्यावर मुंबईचे वर्चस्व प्रस्थापित करून दिले. पहिल्या दिवसअखेरच मुंबईने 94 धावांची आघाडी घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी ही आघाडी 300-350ची महाआघाडी होईल, असा विश्वास मुंबईच्या फलंदाजीने निर्माण केला आहे. खेळ थांबला तेव्हा आयुषने 163 चेंडूंत 127 धावा फटकावल्या होत्या.