धाडसी हकालपट्टीनंतर पाकिस्तानचा पराक्रम; इंग्लंडवर 152 धावांनी मात; नोमान अलीच्या फिरकीचे आठ विकेटस्

पाकिस्तानच्या पराभवाची साडेसाती अखेर सहा पराभवांनंतर संपली. आधी ऑस्ट्रेलिया, नंतर बांगलादेश आणि आता इंग्लंडकडून दारुण कसोटी पराभवाची झळ बसल्याने पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती. पण मुल्तान कसोटीच्या चौथ्या दिवशी 297 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा संघ नोमान अलीच्या फिरकीपुढे 144 धावांतच उद्ध्वस्त झाला आणि पाकिस्तानने 43 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मायभूमीत विजयाचा जश्न साजरा केला. कसोटीत 9 विकेटस् टिपणारा साजिद खान मुल्तानच ‘सामनावीर’ ठरला. या विजयामुळे पाकिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून आता तिसरी आणि शेवटची कसोटी 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे सुरू होईल.

पाकिस्तानच्या पराभवाच्या लाजिरवाण्या षटकारामुळे खडबडून जागे झालेल्या पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने दुसऱ्या कसोटीपूर्वी संघात अनेक दिग्गजांना बसवण्याचा धाडसी निर्णय घेत केलेले होलसेल परिवर्तन पाकिस्तानी संघाच्या पथ्यावर पडले. पाकिस्तानच्या 297 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची 2 बाद 36 अशी अवस्था करून पाकिस्तानी संघात चैतन्य संचारले होते. विजयाची दोघांना संधी असली तरी पाकिस्तानचे पारडे जड होते. 38 वर्षीय फिरकीवीर नोमान अलीने पाकिस्तानी संघाची मान उंचावणारी कामगिरी करताना 48 धावांत 8 विकेटस् घेण्याची किमया केली आणि पाकिस्तानची मायदेशातील पराभवाची मालिका संपुष्टात आणली.

नोमानच्या फिरकीपुढे इंग्लिश फलंदाजांचा थरकाप

काल 7 विकेटस् टिपणाऱ्या साजिद खानने चौथ्या दिवशी दुसऱ्याच षटकात संघाला पहिले यश मिळवून देत सनसनाटी सुरुवात केली. त्यानंतर पुढील सातही फलंदाज नोमानच्या फिरकीने बाद केले. त्याच्या फिरकीसमोर सारेच इंग्लिश फलंदाज नतमस्तक झाले. पाहुण्यांची 6 बाद 88 अशी केविलवाणी अवस्था असतानाच पाकिस्तानला विजयाची चाहूल लागली होती. कर्णधार शान मसुदने साजिद-नोमानच्या फिरकीमुळे चेंडू वेगवान गोलंदाजांच्या हातात दिलाच नाही. बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्स यांनी सातव्या विकेटसाठी 37 धावांची भागी रचून धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, पण ही जोडी फुटल्यानंतर इंग्लिश फलंदाजांचा बाजार 144 धावांवरच उठला. इंग्लंडचे दहाही विकेटस् साजिद आणि नोमानच्या फिरकीने टिपले.

43 महिने आणि 11 कसोटीनंतर… .

पाकिस्तानसाठी गेली काही वर्षे अत्यंत वाईटच गेली आहेत. गेल्याच महिन्यात बांगलादेशने पाकिस्तानात येऊन त्यांचा दोन्ही कसोटींत केलेला पराभव हा सर्वांच्याच जिव्हारी लागला होता. त्या पराभवाचे दुःख कमी होत नाही तोच इंग्लंडने पहिल्या कसोटीत डावाने पराभव केला. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने दुसऱ्या कसोटीसाठी संघातून बाबर आझम, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाहसारख्या दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवत कामरान गुलाम, साजिद खान आणि नोमान अली या खेळाडूना संधी दिली आणि या तिघांनीही जबरदस्त कामगिरी करत संघाला विजयश्री मिळवून दिली. फेब्रुवारी 2021 मध्ये रावळपिंडी कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर तब्बल 44 महिने पाकिस्तान विजयापासून दूर फेकला होता. या दरम्यान 11 कसोटी पाकिस्तान मायभूमीत खेळला. त्यात 4 ड्रॉ झाल्या, तर 7 कसोटींत हार पत्करावी लागली. अखेर 12व्या कसोटीत गुलाम, अली आणि खानच्या कामगिरीने पाकिस्तानच्या विजयाचे खाते पुन्हा उघडले.