लोअर परळला उभारण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी पाच हजारपेक्षा जास्त कपडे आणि 50पेक्षा जास्त सायकली जमा झाल्या आहेत. प्रवासाच्या सुविधेअभावी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा सोडावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे, याकरिता यंदा एक हजार सायकली वितरित करण्याचा संकल्प आहे.
‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम 17 ते 23 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लोअर परळ येथील पेनिन्सुला बिझनेस पार्क मेनगेटच्या बाजूला सुरू राहणार आहे. पुंडलिक लोकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन ‘व्हाईट आर्मी’चे सर्वेसर्वा अशोक रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार सुनील शिंदे, समाजसेवक डॉ. नीलेश मानकर, महेश चव्हाण, शिवशाहू प्रतिष्ठान अध्यक्ष रवींद्र देसाई उपस्थित होते. दिवंगत उद्योजक रतन टाटा यांच्या विचारांना आणि कार्याला सलाम म्हणून या वर्षीचा हा उपक्रम त्यांना समर्पित करण्यात येणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.
दिवाळीच्या सणाचा आनंद गोरगरीब नागरिकांनादेखील लुटता यावा यासाठी ‘माणुसकीची भिंत’ या अभिनव उपक्रमा अंतर्गत त्यांना सुस्थितीतील जुने-नवे कपडे, जीवनाश्यक वस्तू, मेडिकल इक्विपमेंट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, शालेय साहित्य, सायकल आदी दान करण्याचे आवाहन आभार फाउंडेशन, बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघ विभाग, लोअर परळ व शिवशाहू प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नागरिक, सामाजिक संस्था आणि कंपन्यांना करण्यात आले आहे.
संपर्क ः 8655908526