जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवणार, जुलै 2025 पासून नवा अभ्यासक्रम सुरू होणार

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे अखंड हिंदुस्थानची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अॅण्ड स्ट्रटेजिक स्टडीज या नावाने अभ्यासक्रम सुरू होणार असून जेएनयूच्या  स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजअंतर्गत सुरू केला जाईल. या कोर्समध्ये मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती, मुत्सद्दीपणा आणि गनिमी युद्धनीती शिकविण्यावर भर दिला जाईल. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षांत सुमारे 15 ते 35 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. जुलै 2025 पासून डिप्लोमा, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडून 10 कोटी

या उपक्रमासाठी महाराष्ट्र सरकारकडून 10 कोटी रुपये मिळाल्याचे जेएनयूच्या प्राचार्या शांतिश्री धुलीपुडी पंडित म्हणाल्या. आम्हाला देशाच्या ज्ञान व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता तसेच सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यासासाठी पर्यायी मॉडेल्स आणायचे होते. जेएनयूमधील सध्याचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने पाश्चात्य अँग्लो-अमेरिकन मॉडेलचा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, विशेषतः त्यांची नौदल शाखा, त्यांची नौदल युद्धाची संकल्पना आणि हिंदवी स्वराज या संकल्पनेचा नीट अभ्यास केलेला नाही. आम्हाला वाटले की यांचाही अभ्यास करायला हवा. आपला देश बदलाच्या काळातून जात आहे आणि म्हणूनच आपला इतिहास आणि प्रतीके पुनर्मूल्यांकन करणेदेखील महत्त्वाचे आहे, असे शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितले.