अभिनेता शाहरुख खान त्याचा हजरजबाबीपणा आणि सेन्स ऑफ ह्युमरसाठी ओळखला जातो, पण सध्या शाहरुखने सेन्स ऑफ ह्युमर न दाखवण्याचे ठरवले आहे. मजा मस्ती करणे सध्या महागात पडते असे त्याचे म्हणणे आहे. एका पॉडकास्टमध्ये शाहरुखने असे वक्तव्य केले.
लोकान्नो फेस्टिव्हलमधील मीट्स पॉडकास्टमध्ये शाहरुख खान म्हणाला, मला कॉमेडी फिल्म्स करायच्या आहेत, मात्र माझ्या सेन्स ऑफ ह्युमरला लोक चुकीच्या पद्धतीने घेतात. खरं सांगायचं तर माझा सेन्स ऑफ ह्युमर आधीपासूनच चांगला आहे. मी लोकांना हसवू शकतो, पण सध्या वेळ ठीक नाही. म्हणून मी स्वतःला वेळोवेळी थांबवतो. माझी टीम मला नेहमीच सांगते की, तुझे जोक लोकांना समजत नाहीत.’ तो पुढे म्हणाला, ‘सध्या लोक खूपच संवेदनशील झाले आहेत. आपण काहीतरी बोलणार आणि ते लोकांना लागणार. त्यापेक्षा सेन्स ऑफ ह्युमर नसलेला बरा, असे शाहरुख म्हणाला.