सोन्याला ‘सोनेरी’ दिवस,  भाव 79 हजार रुपये तोळा

ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याला अक्षरशः सोनेरी दिवस आले आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोने आता 79 हजार रुपये तोळा झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या महिन्याच्या अखेरपासून लग्नसराईला सुरुवात होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत लग्नाचे मुहूर्त आहेत. त्याआधीच सोने 80 हजारांपर्यंत पोहोचू शकते, असे बोलले जात आहे.

सोन्याचा भाव आज 500 रुपयांनी वाढला. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,980 रुपयावर पोहोचला. दिवाळीपूर्वी दागिने खरेदी करणाऱया ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. सराफा बाजारात दिवसागणिक सोन्याची किंमत नवनवीन उच्चांकच गाठत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,980 इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,400 रुपये आहे. 1 किलो चांदीची किंमत ही आज 99 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे.