वेब न्यूज – लघुग्रहांचा सामना

लघुग्रह हे पृथ्वीसाठी कायम धोकादायक मानण्यात येतात. 66 दशलक्ष वर्षांपूर्वी अशाच एका लघुग्रहाच्या धडकेत डायनासोर पूर्णपणे नष्ट झाले होते. अशा संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने 2022 साली डबल एस्टेरॉइड रीडायरेक्शन टेस्ट (DART) ही यशस्वी मोहीम राबवली होती. या मोहिमेत एका लघुग्रहाला अंतराळ यानाने धडक देऊन त्याचा प्रवासाचा मार्ग बदलण्यात नासाला यश आले होते. पृथ्वीच्या दिशेने एखादा लघुग्रह आल्यास पृथ्वीच्या संरक्षणासाठी त्या लघुग्रहावर अशी कारवाई करण्याची नासाची योजना आहे.

येणाऱ्या भविष्यात पृथ्वीला असा काही धोका सध्या तरी आढळलेला नसला तरी अपोफिस हा लघुग्रह पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे निरीक्षण नंतर समोर आले आहे. नासा आणि हिंदुस्थानी अंतराळ संस्था ‘इस्रो’ यांच्या जोडीने जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या अंतराळ संस्था या ग्रहाचा सतत पाठपुरावा करत असतात व त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. या मागोव्यासाठी नेटवर्क फॉर स्पेस ऑबजेक्ट्स ट्रकिंग ऍण्ड ऍनालिसिस (NETRA) हा प्रकल्पदेखील ‘इस्रो’तर्फे राबवण्यात येत आहे.

लघुग्रहापासून पृथ्वीला होऊ शकणाऱ्या एखाद्या संभाव्य धोक्याचा मुकाबला करण्यासाठी आता नासाने एक नवा प्रकल्प आखल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. ‘डार्ट’ हा 2022 साली राबवलेला यशस्वी पर्याय उपलब्ध असताना आता अंतराळ यानाच्या जोडीने आण्विक शस्त्राचादेखील वापर करण्याची तयारी नासाने आखलेली आहे. पृथ्वीच्या जवळच्या वस्तू आणि लघुग्रह यांच्यापासून संरक्षणासाठी ही एक बहुआयामी अशी योजना असणार आहे. एखाद्या मोठय़ा आकाराच्या खडकाने पृथ्वीच्या दिशेने आपला रोख वळवल्यास त्याला नष्ट करण्यासाठी, त्याचे तुकडे करण्यासाठी अथवा त्याचा मार्ग बदलण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी नासा करत आहे. 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘आर्मागेडन’ या हॉलीवूड चित्रपटात लघुग्रहाचा सामना करण्यासाठी अशी अण्वस्त्र हल्ल्याची योजना दाखवण्यात आलेली होती. अण्वस्त्राच्या जोडीलाच एक हजार अंतराळ यानांची फौजदेखील प्रतिकारासाठी वापरण्याची योजना नासा योजत आहे.

स्पायडरमॅन