राज्यात महायुती आणि भाजपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने आता त्यांच्यातडून रडीचा डाव करण्यात येत आहे. महाविकास आघाडीला मताधिक्क्य असलेल्या मतदारासंघातून महाविकास आघाडीच्या अनेक मतदारांची नावे वगळण्यात येत आहेत. तसेच खोट्या अर्जाद्वारे अनेक बोगस नावे मतदारयादीत टाकण्यात येत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत असेल तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक कशी होणार, असा सवाल काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत निवडणूक पारदर्शकेबाबत सवाल उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका घेण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मात्र, राज्यात भाजप आणि महायुतीला पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून रडीचा डाव करण्यात येत आहे. मतादारयादीत सर्व हेराफेरी करण्यामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. भाजप आणि महायुतीकडून महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे मतदान यादीतून वगळण्याचे पाप करण्यात येत आहे. 7 नंबरचा फॉर्म भरून अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात येत आहे.महाराष्ट्रातील जनता भाजपचे पाप कधीही सहन करणार नाही, असेही पटोले यांनी ठणकावले. राज्यातील जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येत आहे. जनता या लोकांना त्यांची जागा दाखवेल. याबाबत आम्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेत योजना दूतांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्याच्या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या या घटना आहेत. तसेच घरातून मतदान करण्याची प्रक्रियाही पारदर्शक असायला हवी. अनेक खोटे अर्ज दाखल करत अनेक नावे मतदार यादीतून काढण्यात येत आहे. तसेच अनेक खोटी नावे नोंदवली जात आहेत.या गैरप्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयुक्तांची भेट घेत त्यांच्यासमोर याबाबतची माहिती देत आमच्या मागण्या मांडणार आहोत, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.
प्रत्येत मतदारसंघात सुमारे 5 हजार खोटे मतदार वाढवले जात आहेत. निवडणूक आयोगा सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्याप्रमाणे काम करत आहे, याबाबत आमच्या मनात संशय नसल्याचे राष्ट३वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. तसेच मतदार यादीतील छपाई आणि घोळाबाबतही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात येतात. मात्र, मतदारयादीही योग्यप्रकारे छापली जात नाही. मदतारयादीत नाव शोधताना अनेक दिवस जातात. एकाच घरातील व्यक्ती विविध मतदारकेंद्रावर मतदान करायला जातात, हा नेमका काय प्रकार आहे. मतदानाच्या टक्केवारीसाठी हे सर्व करण्यात येत आहे काय, असा सवालही आव्हाड यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त मते मिळाली, त्या मतदारसंघात अडीच ते दहा हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येत आहेत. तसेच अनेक खोटी नावे घुसडण्यात येत आहे. भाजप आणि महायुती घाबरल्याने त्यांच्याकडून अशी कामे करण्यात येत आहेत, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच यावेळी मतदार ओखळपत्रावरील नाव आणि फोटोतील तफावत उघड केली. तसेच प्रत्येक मतदारांनी आपली नाव यादीत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.