अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. त्याच्या निवासस्थानाजवळ येणाऱ्यांवर आणि सेल्फी काढणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर धमकीचे मेसेज आले असून त्यात सलमान खानकडून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाहीत तर बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षाही भयंकर मृत्यू होईल, अशी धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या हवाल्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला आहे. यामध्ये अभिनेता सलमान खान याच्याकडून 5 कोटींची मागणी केली आहे. मेसेज पाठवणाऱ्याने धमकीही दिली आहे. या धमकीला हलक्यात घेऊ नका. सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईकडून शत्रूत्व संपवायचे असेल तर त्यांना पाच कोटी द्यायला हवे. जर पैसे नाही दिले तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट असेल, अशी धमकी सलमान खानला दिल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. सध्या याबाबतचा तपास सुरू आहे.