ऐन दिवाळीत रवा, मैदा, आट्याचे दर वाढणार

सातत्याने महागाईचा सामना करावा लागत असलेल्या ग्राहकांना ऐन दिवाळीत आणखी महागाईला सामोरे जावे लागणार आहे. मागील हंगामात गहू, हरभरा आणि मसूरचे उत्पादन घटले होते. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरात मोठी वाढ झाली आहे. त्यात केंद्र सरकारने काही अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ केल्याने ऐन दिवाळीत गहू, रवा, मैदा, आटा, बेसन पीट, चणाडाळ आणि अख्खा मसूर व मसूर डाळीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यासह देशात गहू, हरभरा आणि मसूरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे या अन्नधान्यासह त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचेही दर वाढलेले आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा खुल्या बाजारातील दर अधिक आहेत. त्यामुळे वाढलेल्या महागाईमुळे नागरिक आधीच त्रस्त झाले असताना, पुन्हा त्यात दरवाढीची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा फटकाही सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. मार्केटयार्डातील गुळ भुसार बाजारात मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानातून गव्हाची आवक होते. हरभऱ्याची आवक मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह ऑस्ट्रेलियातून आवक होते, तर मध्य प्रदेश आणि तुर्की येथून मसूरची आवक होते. देशात हरभऱ्याचे उत्पादन घटल्याने ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात हरभरा आयात करण्यात आला होता. तर, मसूर तुर्कीतून आयात केला जातो. गव्हाचे दर वाढल्याने गव्हासह रवा, मैदा, आट्याचे दर वाढलेले आहेत. हरभऱ्यामुळे चणाडाळ आणि बेसन पिटाचे दर वाढले आहेत.

गहू, हरभरा आणि मसूरची खुल्या बाजारातील किंमत सरकारच्या किमतीपेक्षा खूपच अधिक आहे. पुन्हा सरकारने किंमत ठरवली असल्याने गहू, हरभरा आणि मसूरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने ही दरवाढ आहे.