डॉक्टर असल्याचे भासवून सोशल मीडियावर वैद्यकीय सल्ले देणे महिलेला महागात पडले आहे. पदवी नसतानाही रुग्णावर उपचार केल्या प्रकरणी महिलेविरोधात समता नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
कांदिवली पूर्व येथे एक महिला राहते. ती स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवते. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ते आजारावर कोणते उपचार करावे याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत असते. ती महिला घरामध्ये दवाखाना थाटून उपचार करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली गेली. पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने जाऊन तिच्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा तिने फिलोसॉफी इन अल्टरनेटिव्ह मेडिसीन ही पदवी असल्याचे सांगितले. ती पदवी इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेटीव्ह मेडिसन्सतर्फे मिळविल्याची माहिती तिने पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या आधारे पालिकेने महाराष्ट्र वैद्यक परिषद (एमएमसी) कडे विचारणा केली.
त्या पदवीद्वारे राज्यात सेवा देता येत नसल्याचे एमएमसीने पालिकेला सांगितले. पदवी नसतानाही उपचार करणाऱ्या त्या महिलेविरोधात समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.