निवडणूक आयोगाच्या इशाऱ्यानंतरही भाजपचा ‘व्होट जिहाद’चा मुंबईत नारा, खासदार सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची दखल घेणार?

व्होट जिहादची चौकशी करण्याची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत बुधवारी केली होती. या घोषणेला चोवीस तास पूर्ण होण्याच्या आतच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्होट जिहादचा नारा दिला.

लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाल्यामुळे विरोधकांचे उमेदवार निवडून आले होते असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्य निवडणूकअधिकारी एस. चोक्कलिंगम यांना यांना याबाबत विचारले असता, व्होट जिहाद या शब्दप्रयोग चार महिन्यांपासून सुरू आहे, पण निवडणूक आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. त्यामुळे आता काय घडत आहे ते तपासून कारवाई करणार, यामध्ये कोणताही पक्षपात होणार नाही असे आश्वासन एस. चोक्कलिंगम यांनी दिले होते.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या या विधानाला चोवीस तास पूर्ण होण्याच्या आतच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी व्होट जिहादचा पुनरुच्चार केला.

त्रिवेदी नेमके काय म्हणाले

विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांकडून मोठय़ा प्रमाणावर व्होट जिहादचे प्रकार करण्याची तयारी सुरू असल्याने मतदारांनी हे षड्यंत्र समजून घेत ते हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केले.

निवडणूक आयोगाचे ‘मॉनिटरिंग’

सर्व राजकीय पक्ष, प्रसिद्धीमाध्यमे उमेदवारांच्या जाहिरातींच्या प्रामाणिकरणासाठी राज्य व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्रचारसभा, पत्रकार परिषदा आणि वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलवरील बातम्यांमधील विधाने आणि वक्तव्यांवर बारीक लक्ष ठेवले जाते. मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीमार्फत लक्ष ठेवले जाते. त्यामुळे भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी व्होट जिहादबाबत पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोग पडताळणी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.