केजरीवाल देणार मविआला ताकद, ‘आप’चा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय

भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न निर्णय घेतला आहे. ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशपातळीवर इंडिया आघाडीला ताकद देण्यावर ‘आप’चा आगामी काळात भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आम आदमी पक्षाने हरयाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपचा मोठा फायदा झाला होता. त्यामुळे आपने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत या दोन्ही राज्यांतील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

मतदारांच्या मनात संभ्रम नको

महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे; परंतु पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व त्यासाठी फारसे उत्सुक नाही. इंडिया आघाडीची ताकद वाढवावी असे वरिष्ठांचे मत आहे. मतदारांच्या मनात संभ्रम नको म्हणून महाराष्ट्रात निवडणुकीतून ‘आप’ने माघार घेतल्याची चर्चा आहे.