उत्तर प्रदेशातील बहराइच येथे देवी विसर्जनातील मिरवणुकीवरून झालेल्या हिंसाचारात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील आरोपी आणि पोलिस यांच्यात चकमक झाली. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात सरफराज आणि तालिम हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपींनी हिंसाचारादरम्यान वापरलेली शस्त्र हांडा बसेहरी या भागात ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या शस्त्रांचा शोध घेण्यासाठी पोलिस पाच आरोपींना या भागात घेऊन आले होते. मात्र, दोन आरोपींनी नेपाळच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि यात दोघेही पायाला गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अतिरीक्त पोलीस महानिरीक्षक अमिताभ यश यांनी दिली आहे.
म्हणून करावा लागला गोळीबार
हिंसाचारात वापरलेली शस्त्र जप्त करण्यासाठी आम्ही दोन्ही आरोपींना घेऊन जात होतो. त्यावेळी दोन आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात दोघे जखमी झाले. यावेळी शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींपैकी अब्दुल हमीद आणि आणखी दोघांनी गोपाल मिश्रा या तरुणावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.