खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभेबरोबरच येथे लोकसभेसाठीही २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांंदेड मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव केला. मात्र निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांची प्रकृती ढासळली आणि हैदराबादेत उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसने त्यांचे पुत्र रवींद्र यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
इम्तियाज जलील नांदेडातून उभे राहणार
मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीनचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. जलील यांची उमेदवारी ही काँग्रेसला मिळणार्या मतांची विभागणी करण्यासाठी भाजपने केलेली कुटील खेळी असल्याचे बोलले जात आहे. मुळात एखाद्या लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर त्याच्या वारसाला बिनविरोध निवडून देण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. मात्र जलील यांच्याकडून भाजपसाठी या प्रथेला हरताळ फासण्यात येत असल्याची चर्चा आहे.