मुंबई लुटू देणार नाही, मिंधे सरकार हुतात्मा स्मारक विकून अदानीचा ‘A’ आणि बिल्डरचा ‘B’ लावतील, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मिंधे सरकारने आता मुंबईतल्या मुंबई महापालिकेच्या जागा विकायला काढल्या आहेत. काही दिवसांनी मिंधे सरकार हुतात्मा स्मारक विकून अदानीचा ‘A’ आणि बिल्डरचा ‘B’ लावतील. इतकंच नाही तर सर्व कोळीवाडे विकून एखाद्या बिल्डरच्या घशात घालतील, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

 

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेची जागा छत्रपती शिवाजी महाराज मंडई जिथे मासे विक्रेते बसायचे ती आता लिलावात काढली आहे. वरळी आणि मलबार हिलमधल्या जागा विकायला काढल्या आहेत. भाजपचे खासदार पियुष गोयल जेव्हा प्रचार करत होते तेव्हा त्यांना माशांचा वास सहन नाही झाला त्यांना नाकाला रुमाल लावला. आता शिंदे सरकार मासे विक्रेत्यांची जागा विकत आहेत. वरळीतल्या जागेवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जागा बांधून द्या. पण आता ही जागाही सरकारने लिलावात काढली आहे. काही दिवसांनी शिंदे आणि भाजप सरकार हुतात्मा स्मारकही लिलावात काढतील. जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा हा लिलाव आम्ही थांबवू आणि या लिलावाची चौकशीही करू. कुठलेही नगरसेवक नसताना, कुठलेही लोकप्रतिनीधी नसताना लिलावाचे अधिकार दिले कोणी? याचे उत्तर एकच आहे घटनाबाह्य आणि कंत्राटदार मंत्री एकनाथ शिंदे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबई महापालिकेच्या फिक्स डिपॉजिटचा पैसा आणि मुंबईच्या विकासासाठी वापरला. शिंदे आणि भाजप सरकारचं आर्थिक नियोजन हे नोटबंदीसारखं आहे. पीएम केअर फंड प्रमाणे आम्ही नियोजन केलं नव्हतं. काही दिवसांनी हे लोक कोळीवाड्यातही घुसतील. आणि कोळीवाड्याचे क्लस्टर करून आवडत्या बिल्डरच्या घशात घालतील. महाराष्ट्रात कधीच एवढी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळलेली नव्हती. लिंचिंगसारखी संस्कृती ही भाजपची आहे. आज महाराष्ट्रात जी कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे त्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे. अदानींवर टीका केली तर भाजप बचावासाठी का धावतं? अदानी आणि भाजपची काही गुंतवणूक आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

धारावी आणि मुंबईतल्या जागा विकण्याचा मुद्दा हा माझ्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाहीये. हा मुंबईच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे. ही मुंबई मी लुटू देणार नाही, हे मी ठरवलं आहे. आमचा अदानीला विरोध नाही. पण कंत्राटाच्या बाहेर जाऊन अनियमितता आणि बकायदेशीर गोष्टी होत असतील तर आमचा विरोध आहे. जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या कंत्राटाचा पुर्नविचार करू आणि गरज पडल्यास रद्द करू, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.