मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. एअर इंटेलिजन्स युनिटने दोन प्रकरणात 1.25 कोटींच्या सोन्यासह दोघांना अटक केली आहे. दोघांविरोधात सीमा शुल्क अधिनियम- 1962 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या सोन्याचे वजन 1.725 किलोग्रॅम आहे. प्रवाशांनी हे सोने त्यांच्या अंतर्वस्त्रात लपवले होते. तर दुसऱ्या प्रकरणात सीमा शुल्क विभागाने 33 लाख रुपयांचे सोने आणि 6 लाख रुपयांच्या फोनसोबत एका प्रवाशाला अटक केली आहे. मुंबईच्या सीमा शुल्क विभागाने सांगितले की, एअर इंटेलिजन्स युनिटने दुबईहून बँकॉकला जाणाऱ्या एका प्रवाशाचा पाठलाग केला. ही घटना 15 ऑक्टोबरची आहे. तो विमानतळ कर्मचाऱ्यासोबत शौचालयात जात होता. तपासात प्रवाशाजवळ सोने सापडले. प्रवाशाने हे सोने अंतर्वस्त्रात लपवले होते, याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती.
सीमा शुल्क विभागाने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली की, 24 कॅरेट सोन्याचे तीन तुकडे मिळाले आहेत. त्याचे वजन जवळपास 1.725 किलोग्रॅम आहे. पकडलेल्या सोन्याची किंमत 1.25 कोटी रुपये आहे. तपासात प्रवाशाने दावा केला की सोन्याचे हे हे नग त्याला दुसऱ्या प्रवाशाने दिले होते. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, एआययूने विमानतळावर कडक तपास मोहीम राबवली होती. शर्थीच्या प्रयत्नानंतर दुसऱ्या आरोपीलाही पकडण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपींनी याआधी दोनदा तस्करी केली आहे.
तर अन्य एका प्रकरणात सीमा शुल्क विभागाने दुबईहून मुंबईला पोहोचलेल्या एका प्रवाशाजवळ 24 कॅरेट सोन्याचे चूर्ण सापडले आहे. त्याचे वजन 455 ग्रॅम आहे. त्याची अंदाजे किंमत 33 लाख 880 रुपये आहे. याशिवाय महागडे फोनही त्याच्याकडे आढळून आले आहेत. आरोपीने फोन त्याच्या सामानामध्ये लपवून ठेवले होते. तर सोन्याचे चूर्ण अंतर्वस्त्रात लपवून आणले होते.