IND vs NZ Test – पावसानं बॅटिंग केलेल्या खेळपट्टीवर टीम इंडियाची घसरगुंडी; न्यूझीलंडनं 46 धावांत केलं गारद

पावसाने धुवाधार बॅटिंग केलेल्या बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर टीम इंडियाची घसरगुंडी उडाली. जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या हिंदुस्थानला न्यूझीलंडने अवघ्या 46 धावांमध्ये गुडाळले. न्यूझीलंडचा वेगवान मारा एवढा तिखट होता की, हिंदुस्थानचे 9 बॅटर एकेरी धावसंख्येवर बाद झाले.

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह 5 फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. हिंदुस्थानकडून यष्टीरक्षक बॅटर ऋषभ पंत याने सर्वाधिक 20, तर यशस्वी जैस्वालने 13 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. विल्यम ओ’रुर्कने 4 आणि टीम साऊदीने 1 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली.

दरम्यान, हिंदुस्थानमध्ये खेळताना कसोटीच्या एका डावात सर्वात कमी धावसंख्या करण्याचा लाजिरवाणा विक्रम रोहित शर्माच्या संघाच्या नावावर झाला. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. 2021 मध्ये वानखेडे कसोटीत न्यूझीलंडचा संघ 62 धावांमध्ये गारद झाला. तत्पूर्वी 1987 ला हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 75 धावांमध्ये बाद झाला होता.