शहराची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या टीएमटीच्या ताफ्यात 160 एसी बसेस दाखल होणार होत्या. मात्र बसेसच्या खरेदीच्या प्रस्तावाला ठेकेदारांनी जादा दराच्या निविदा भरल्याने प्रशासनाने फेरनिविदा काढल्या आहेत. दरम्यान टेंडर प्रक्रियेत एसी बसेस अडकल्या असल्याने वातानुकूलित बसेससाठी ठाणेकरांना अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ठाणे परिवहन सेवेचा 2024-25 चा 694 कोटी 56 लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परिवहन ताफ्यात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शून्य उत्सर्जन प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक बसेससह वातानुकूलित ई बसेसचा समावेश करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात 123 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्याने सद्यस्थितीत टीएमटीच्या 446 बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. यात वित्त आयोगाच्या निधीतून ग्रॉस कॉस्ट कॉण्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर वातानुकूलित इलेक्ट्रिक 9 मीटरच्या100 बसेस आणि 12 मीटरच्या 60 बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. या 160 वातानुकूलित ई बसेसच्या खरेदी, संचलन (चालकासह) आणि देखभालीसाठी टीएमटी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र ठेकेदारांनी जादा दराची अपेक्षा ठेवल्याने परिवहन व्यवस्थापनाने हे प्रस्ताव धुडकावले असून 160 ई बसेससाठी फेरनिविदा काढली आहे.
डबल डेकरचा प्रस्ताव तूर्तास बासनात
ठाण्यात नागरीकरण वाढल्याने दिवसेदिवस वाढत असलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन टीएमटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वातानुकूलित 10 डबल डेकर बस दाखल करण्याचे ठरले होते. मात्र टीएमटी प्रशासनाने याबाबत अद्याप काहीच हालचाली केलेल्या नाहीत. किंबहुना डबल डेकर बसेस वगळून केवळ 160 ई वातानुकूलित बसेससाठीच निविदा प्रक्रिया राबवली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान डबल डेकरचा प्रस्ताव तूर्तास बासनात गेला असल्याने ठाणेकरांची डबल डेकर बसमधून फिरण्याची स्वप्ने लांबणीवर गेली आहेत.
• सध्या ठाणे परिवहन सेवेकडे एकूण 414 बसेसचा ताफा आहे. यामध्ये 101 वातानुकूलित तर 313 साध्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. काही बसेस ठेकेदारामार्फत चालवल्या जातात. काही बसेस परिवहन विभागाकडून चालविण्यात येत आहेत.
• शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाणे परिवहन सेवा मोठ्या क्षमतेने शहरात काम करीत असून ठाणेकरांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी काम करते.
• प्रत्येक वर्षी जवळपास 20 हून अधिक बस भंगारात काढल्या जात आहेत. 2018 मध्ये 42, 2019 मध्ये 15 तर 2020 मध्ये 17 बसेस भंगारात काढल्या गेल्या, तर आणखीन 17 नादुरुस्त बसेस भंगारात काढण्यात येणार आहेत.