निवडणूक आचारसंहिता लागली तरी महामंडळांवरील नियुक्त्या सुरूच

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे पण तरीही ब्राह्मण समाजासाठी स्थापन करण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अजित पवार गटाचे युवा नेते आशीष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार तसेच बापू भेगडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज दिली.

राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना नियोजन विभागाच्या 3 ऑक्टोबर 2024 रोजी  शासन निर्णयाद्वारे कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. यानुसार आज  महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी आशीष  दामले यांची निवड करण्यात आली. तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 मधील कलम 12 (2)(ब)मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. 1 अन्वये ही निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.