मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामुहिक अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावर थुंकला होता. न्यायवैद्यक प्रयोगशाळेने तेथील थुंकीचे नमुने घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर पुरावे गोळा करण्यासाठी मुख्य सराईत आरोपीची थुंकी, रक्त, नखे, केसांचे नुमने घेतले जाणार आहेत. अख्तर उर्फ शोएब बाबू शेख (27, रा. मंतरवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पुलकर्णी यांनी त्याला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
तरुणीवर सामूहिक अत्याचारातील मुख्य अख्तर याला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून बेडय़ा ठोकल्या आहेत. यापूर्वी त्याचा साथीदार चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (20, रा. उंड्री) याला अटक केली होती. मंगळवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांच्या आणखी एका फरार साथीदाराचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी आरोपींनी पीडितेचा मित्रावर हल्ला करून त्याला जखमीही केले होते. 3 ऑक्टोबरच्या रात्री पावणे अकरा वाजल्यापासून दुसऱया दिवशी मध्यरात्री (दि. 4) दीड वाजण्याचा सुमारास आरोपींनी घृणास्पद प्रकार केला. आरोपी अख्तर शेख सामुहिक बलात्कारातील मुख्य आरोपी आहे. त्याने व साथीदारांनी एकत्रीतरीत्या केलेले हे घृणास्पद कृत्य करून मानवी जिवीताला काळिमा फासणारी घटना असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.
तरुणीला धमकाविण्यासाठी आरोपींनी कोयत्याचा वापर करीत पिडीतेच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट, सोनसाखळी, चांदीच्या अंगठय़ाही चोरून नेल्या. आरोपींकडून कोयता, गुह्यातील वाहन जप्त करायचे आहे. अख्तर हा गुन्हा केल्यापासून 12 ते 13 दिवस फरार होता. या काळात त्याने कोठे वास्तव्य केले, त्याला कोणी आसरा दिला. गुन्हा करताना जे कपडे त्याने वापरले होते, ते जप्त करायचे आहे. त्यांच्या लैगिक सक्षमतेची चाचणी (पोटेन्सी टेस्ट) करायची असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी केली. बचाव पक्षाचे वकील राहुल लोणंदकर यांनी पोलीस कोठडीला विरोध करताना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली. गुह्याचा तपास अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे करीत आहेत.