रायगडच्या शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर बांधले नवान्नतोरण, 30 वर्षाची परंपरा कायम

निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. संपूर्ण रायगड जिह्यात उद्या गुरुवारी पौर्णिमा साजरी होत असून त्याच्या पूर्वसंध्येला आज असंख्य शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर जाऊन नवान्नतोरण बांधले. गेल्या 30 वर्षांची ही परंपरा कायम असून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरून यश मिळू दे, अशी प्रार्थनाही यावेळी शिवसैनिकांनी केली.

रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. भाताच्या पहिल्या लोंब्यांना नव भात असेही म्हणतात. गणपतीनंतर भाताची कापणी केली जाते. बाजारात हे भात विकायला नेण्यापूर्वी त्याच्या तांदळाचा भात त्याच तांदुळाची खीर पिंवा भाताचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या भाताची मनोभावे पूजादेखील शेतकरी करतात. वैभवाचे प्रतिक असलेले साठ इंच लांबीचे नवान्नतोरण आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मातोश्री’वर लावण्यात आले. यावेळी मारुती भगत, मंदार नाईक, प्रतीक नाईक, राकेश काठे, उपकार खोत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

ही आहे पार्श्वभूमी

नवान्न पौर्णिमेच्या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱया पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱया दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. रायगडमधील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर जाऊन नवान्नतोरण बांधले असून परंपरादेखील यानिमित्ताने जपली आहे.