विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष लढायचे की आपल्याला विरोध करणारांना पाडायचे, याचा निर्णय 20 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे घेऊन याच दिवशी आंतरवालीत येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आंतरवाली सराटीत आज पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी विधानसभेला लढायचे की, आरक्षणाला विरोध करणाऱयांना पाडायचे, याचा निर्णय 20 ऑक्टोबरच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ही बैठक म्हणजे कोणतेही शक्तिप्रदर्शन नसल्याचेही ते म्हणाले. इच्छुकांनीही आपापल्या कागदपत्रांसह या बैठकीला हजर राहावे, असेही ते म्हणाले. या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
काय समजून घ्यायचे…!
आज महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांनी आम्हाला समजून घ्यावे असे म्हटले. त्यावर जरांगे यांनी कडाडून हल्ला चढवला. ‘काय समजून घ्यायचे? मराठा आंदोलकांवर गोळय़ा चालवण्यात आल्या, सगेसोयऱयांचा अध्यादेश धूळ खात पडला आहे. कोणतेही गॅझेट लागू करण्यात आले नाही. मराठय़ांच्या नाकावर टिच्चून 15 जाती ओबीसी प्रवर्गात घुसवण्यात आल्या. अनेक मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले… आमची कोणतीही मागणी मान्य झाली नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठय़ांच्या विकासात खोडा घातला आणि वर आम्हालाच समजून घ्या असे म्हणता?’ असा खोचक टोलाही जरांगे लगावला.