बेकायदा आर्थिक व्यवहार आणि शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल आणि संबंधितांची 85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामध्ये पुणे, सोलापूर, नगर येथील संपत्तीचा समावेश आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ऑगस्ट महिन्यात बांदल यांच्या घरी छापा टाकून घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी ईडीला पाच कोटी 60 लाखांची रोकड, एक कोटीची चार घडय़ाळे आढळली होती. जवळपास 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली होती. दरम्यान, आता शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेड प्रकरणाशी संबंधित बांदल यांच्यासह हनुमंत खेमढारे, सतीश जाधव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पुणे, सोलापूर आणि नगरमधील स्थावर मालमत्तेच्या स्वरूपात असलेली अंदाजे 85 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.