छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या साधारण साडेतीनशे विविध कर्मचाऱ्यांचे वेतन मे ते सप्टेंबर अशा चार महिन्यांपासून मिळालेले नाही. आता दिवाळी सणावेळी तरी वेतन मिळणार का? असा संतप्त सवाल या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत कॉलेज व्यवस्थापन क कोषागार कार्यालय एकमेकांवर चालढकल करत आहेत.
शासकीय मेडिकल कॉलेजची ही तिसरी बॅच असून, 100 विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज जिल्हा रुग्णालयाच्या शेजारील वास्तूत सुरू आहे. नवीन इमारतीचे काम कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर सुरू असून, 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. मध्यंतरी या नूतन इमारतीच्या कामावरील कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन केले होते. त्यानंतर निधी उपलब्ध झाला होता.
आता मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या विविध 350 कर्मचाऱ्यांना मे ते सप्टेंबर अशा चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या कर्मचाऱ्यांमध्ये अधिपरिचारिक व अधिपरिचारिका, लॅब टेक्निशियन, सफाई कामगार आदींसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संदर्भात या कर्मचाऱ्यांनी कॉलेजच्या अधिष्ठाता यांना निवेदन देऊन याबाबतची विचारणा केली आहे. यामध्ये मे क जून महिन्यातील पगारबिले काढून झाली असून, किमान 60 जणांची बिले काढून कोषागार कार्यालयाला पाठवण्यात आली आहेत. कोषागार कार्यालयाकडून बिले लवकरच काढण्यात येतील, असे सांगितले जात आहे. आता दिवाळी सण तोंडाकर आला आहे. त्यामुळे सणापूर्वी वेतन मिळावे, अशी मागणी होत आहे.