मालमत्ता उतारा देण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेणाऱया माळशिरस नगरपंचायतमधील कर निर्धारण अधिकाऱयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. विकास गोरख पवार असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱयाचे नाव आहे.
तक्रारदाराने माळशिरस नगरपंचायतीकडे बिनशेती जागेची नोंद होऊन उतारा मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदरचे अर्ज कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार (वय 38) यांच्याकडे आले असता त्यांनी शासकीय फी व घरपट्टीचे 2780 व 1500 रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधककडे तक्रार करण्यात आली. आज नगरपंचायत कार्यालयात सापळा रचून विकास पवार याला शासकीय फी व लाचेची रक्कम अशी 4280 रुपयांची रोकड घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये पवारविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, कोळी, सोनवणे, घुगे, गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.