ट्रम्प म्हणतात, हमें तो अपनोंने लुटा! मुलाखतीत धक्कादायक विधाने

शत्रूपेक्षाही आपल्या सहकाऱ्यांनीच आपला जास्त फायदा घेतला, अशी टीका रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. युरोपीय संघ आपला सहकारी आहे, मात्र युरोपीय संघासोबत आपले व्यापारी नुकसान 30 हजार कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे, असे ट्रम्पनी सांगितले.

‘इकॉनॉमिक क्लब’मधील मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, आपल्या देशाचे व्यापारी करार फारच वाईट आहेत. हे करार केले कुणी? असे करार करणारे एकतर मूर्ख आहेत किंवा त्यांना यातून पैसे मिळत आहेत. मी चिनी गाड्यांवर 27.5 टक्के कर लावला. नाहीतर अमेरिकेत चिनी गाड्यांचा महापूर आला असता. त्यामुळे आपला वाहन उद्योग बंद झाला असता. तिथल्या नोकऱ्या संपल्या असत्या. याच कारणासाठी मी दक्षिण कोरियाच्या ट्रकवरही जास्त कर लावले. जर हा कर मागे घेतला तर आपण बुडून जाऊ. कराच्या बाबतीत हिंदुस्थान एक कठोर देश आहे. त्यापेक्षा चीन जास्त कठोर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प यांची मानसिक स्थिती बरी नाही

कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्न उपस्थित केला. फेलाडेल्फिया येथील कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प थकल्यासारखे, अस्वस्थ वाटत होते. त्यांचे समर्थक मधेच उठून निघून गेले. मी आशा करते ते ठीक असतील, असे कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.