माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अभिनेता सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळेच सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सलमान खानने काळवीटांची शिकार केली होती. तेव्हापासून सलमान खान बिष्णोई गँगच्या हिटलिस्टवर आहे.
मिड डे या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. जो कोणी सलमान खानसोबत मैत्रीपूर्वक आर्थिक संबंध ठेवेल त्याची अशीच अवस्था केली जाईल अशा इशाराच बिष्णोई गँगने दिला आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
पंजाबी गायक एपी ढिल्लोन याच्या कॅनडातील घरावरही गोळीबार झाला होता. ढिल्लॉन सलमान खान सोबत गाणं करणार होता. म्हणून बिष्णोई गँगने ढिल्लॉनला लक्ष्य केलं होतं. गायक ढिल्लॉनच्या घरावर हल्ला, सलमान खानच्या घरावर हल्ला आणि आता बाबा सिद्दीकी यांची हत्या. हे सर्व हल्ले बिष्णोई गँगने केले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. सलमान खानच्या जवळ जो कोणी असेल बिष्णोई गँग त्यांना लक्ष्य करत आहेत असे वरकरणी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आम्ही आधी एसआरए आणि व्यावसायिक उद्देशातून हा खून झाला का याचा तपास करत होतो अशी माहिती पोलिसांनी दिली. पण आम्ही 70 टक्के खात्रीने सांगू शकतो की सलमान खानसोबतच्या मैत्रीमुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली.