केंद्रीय निवडणूक आयोगने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा 15 ऑक्टोबर 2024 रोजी केली. 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील मतदान केंद्र सज्ज करण्याच्या हालचालींना आत्तापासूनच वेग आला आहे. दोपाली प्रशासन सुद्धा निवडणुकीसाठी सज्ज झाले. तशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पत्रकार परिषदेमध्ये डॉ.अजित थोरबोले म्हणाले की, दापोली विधानसभा मतदार संघात एकूण 3 तालुक्यांचा समावेश असून एकूण 392 मतदान केंद्र समाविष्ट आहेत. त्यापैकी मंडणगड तालुक्यामध्ये 74, दापोली तालुक्यामध्ये 212 आणि खेड तालुक्यामध्ये 106 मतदान केंद्र आहेत. विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा दिनांक हा 20 नोव्हेंबर 2024 हा आहे. दापोली विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली या ठिकाणी स्वीकृत केले जाणार आहेत. 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नामनिर्देशन स्वीकारले जाणार आहेत. दापोली मतदारसंघामध्ये सद्यस्थितीमध्ये एकूण 2 लाख 86 हजार 983 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये एक लाख 37 हजार 774 पुरुष आणि एक लाख 49 हजार 299 स्त्रिया आहेत. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 1,560 आहे. तर, 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 3,668 एवढी आहे. या निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदार आणि 85 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
निवडणुकीच्या कामकाजाकरता 60 क्षत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी भरारी पथकाच्या 18 टीम आणि 7 स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी 60 बसेसची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दापोली विधानसभा क्षेत्रामधील 392 मतदान केंद्रांपैकी 196 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात आलेली आहे. दापोली विधानसभा क्षेत्रामधील सर्व मतदारांना विनंती करण्यात येते, की आपण व्होटर हेल्पलाइन या मोबाईल अॅपद्वारे आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती घेऊ शकतात. सर्व मतदारांनी उस्फुर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी डॉ.अजित थोरबोले मतदारांना केले.