देशात हिट अँड रनच्या घटना वाढत आहेत. नेते मंडळी आणि त्यांच्या मुलांपासून थेट कलाकारांपर्यंत सगळ्यांचा यात समावेश आहे. अशातच मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीनाथ भासी अडचणीत सापडला आहे. श्रीनाथ भासी याला पोलिसांनी हीट अँड रन प्रकरणात अटक केली होती. मंगळवारी त्याची जामिनावर सुटका झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण सध्या ड्रग पार्टीशी संबंधित आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अभिनेता श्रीनाथ भासी याच्या कारने दुचाकीला धडक दिली होती. हा अपघात गेल्या महिन्यात घडला होता. या अपघातात दुचाकीवरील पीडितेला गंभीर दुखापत झाली होती. सध्या पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हिट अँड रन प्रकरणात एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र मंगळवारी अभिनेता श्रीनाथ भासी याची जामिनावर सुटका करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनाथ भासीच्या अटकेचं प्रकरण एका ड्रग पार्टीच्या तपासाशी संबंधित आहे. त्यामुळे अभिनेता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
केरळ पोलिसांनी 23 सप्टेंबर 2022 रोजी यूट्यूब चॅनल अँकरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेता श्रीनाथ भासी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 26 सप्टेंबर 2022 रोजी, शाब्दिक गैरवर्तन प्रकरणात श्रीनाथ भासी यांना चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आलं.