IND vs NZ Test – पावसाने पाणी फेरले, बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस एकही चेंडू न टाकता रद्द

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात आजपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार होती. दोन्ही उभय संघात बंगळुरूत एम. चिन्नास्वामी मैदानावर पहिला सामना रंगणार होता. मात्र मुसळधार पावसामुळे बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.

बंगळुरूत गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मैदान दिवसभर कव्हर करून ठेवण्यात आले. सातत्याने पाऊस कोसळत असल्याने खेळाडूंना सरावासाठीही मैदानात उतरता आले नाही. चहापानाच्या वेळी पाऊस थांबला होता, त्यावेळी पंचांनी मैदानात येऊन पाहणी केली. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पंचांनी आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.

चाहत्यांचा हिरमोड

दोन तुल्यबळ संघातील सामना पाहण्यासाठी एम. चिन्नास्वामी मैदानावर चाहत्यांनी गर्दी केली होती. चहापानाच्या दरम्यान पंच मैदानात आल्याने किमान एका सत्राचा खेळ होईल अशी आशा होती. मात्र पावसाने यावर पाणी फेरले आणि चाहत्यांचा हिरमोड झाला.