अतुल परचुरे अनंतात विलीन, लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना कलाकारांना अश्रू अनावर

अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी मराठी सिने- नाट्यसृष्टीतील कलाकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. लाडक्या मित्राला अखेरचा निरोप देताना कलाकारांच्या अश्रूंचा बांध फुटला.

नाटक, चित्रपट आणि मालिका अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अतुल परचुरे यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर दुपारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, श्रेयस तळपदे, संजय मोने, सुकन्या मोने, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, सुनील बर्वे, उमेश कामत, प्रिया बापट, पुष्कर श्रोत्री यांसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अतुल परचुरे यांना अखेरचा निरोप देताना कलाकार मंडळी भावुक झाली.