सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

‘दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय,’ असा मजकूर डायरीमध्ये लिहून आरणगाव येथील कालिदास मिसाळ (40) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तीन सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिला सावकाराचा समावेश आहे.

आलेश जगदाळे, भगवान जायभाय, शायरा सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी मयताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ (रा. आरणगाव) याने फिर्याद दाखल केली आहे. मयत कालिदास मिसाळ याला तीनही आरोपी दोन वर्षांपासून त्रास देत होते. यातील आरोपी आलेश जगदाळे याच्याकडून मयत कालिदास याने दोन वर्षांपूर्वी शेती कामासाठी 1 लाख रुपये कर्ज काढले होते. त्याच्या मोबदल्यात कालिदास वर्षभर आरोपीच्या ट्रक्टरवर चालक म्हणून काम करीत होता.

कालिदास आजारी असल्यास त्याचा मुलगा प्रदीप हा चालक म्हणून कामाला जात होता. एक वर्ष कालिदास व त्याच्या मुलाने चार महिने असे दोघांनी चौदा महिने आरोपीकडे चालक म्हणून काम केले होते. तरीदेखील आरोपी आलेश जगदाळे हा एक लाख रुपये कर्जाचे व्याज व मुद्दल असे एकूण 3 लाख रुपयांची मागणी करीत होता. तसेच घरी येऊन धमकी देत होता.