
दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय,’ असा मजकूर डायरीमध्ये लिहून आरणगाव येथील कालिदास अभिमन्यू मिसाळ (वय ४०) या तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिला सावकाराचा समावेश आहे.
आलेश बाबूराव जगदाळे (रा. जामखेड), भगवान रामा जायभाय (रा. वंजारवाडी, ता. जामखेड) आणि शायरा नियमत सय्यद (रा. पाटोदा (गरडाचे) ता. जामखेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी मयताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ (रा. आरणगाव) याने फिर्याद दाखल केली आहे.
मयत कालिदास मिसाळ याला तीनही आरोपी दोन वर्षांपासून त्रास देत होते. यातील आरोपी आलेश जगदाळे याच्याकडून मयत कालिदास याने दोन वर्षांपूर्वी शेती कामासाठी १ लाख रुपये कर्ज काढले होते. त्याच्या मोबदल्यात कालिदास वर्षभर आरोपीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. कालिदास आजारी असल्यास त्याचा मुलगा प्रदीप हा चालक म्हणून कामाला जात होता. एक वर्ष कालिदास व त्याच्या मुलाने चार महिने असे दोघांनी चौदा महिने आरोपीकडे चालक म्हणून काम केले होते. तरीदेखील आरोपी आलेश जगदाळे हा एक लाख रुपये कर्जाचे व्याज व मुद्दल असे एकूण ३ लाख रुपयांची मागणी करीत होता. तसेच घरी येऊन धमकी देत होता.
मागील वर्षी कालिदासने सावकार आरोपी भगवान रामा जायभाय याच्याकडून ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जापोटी जायभाय १ लाख २५ हजार रुपयांची मागणी करीत होता. तसेच तिसरी महिला आरोपी शायरा नियामत सय्यद (रा. पाटोदा – गरडाचे) हिच्याकडूनही ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. व्याजापोटी व मुद्दल असे मिळून एकूण ४० हजार रुपयांची मागणी ती करत होती. या पैशांसाठी तिघे सावकार कालिदास याला मारहाण आणि दमदाटी करीत होते. याच त्रासाला कंटाळून कालिदास याने सोमवारी (दि. १४) पहाटे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताच्या खिशात एक डायरी आढळली असून, यामध्ये आलेश बाबूराव जगदाळे, भगवान रामा जायभाय यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असा लिहिलेला मजकूर आढळला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी भगवान रामा जायभाय (रा. वंजारवाडी, ता. जामखेड) या आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.