विविध संकल्पनांनी शिक्षण क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून देणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक प्रधान (86) यांचे आज कल्याण येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शोभना, मुले समीर, सोनाली आणि प्रणाली असा परिवार आहे.
मुंबईतील नामांकित रूपारेल महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून अशोक प्रधान यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. नंतर याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्यपदही भूषविले. त्यानंतर मुंबई विद्यापीठात उपकुलगुरूपद आणि मग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कुलगुरूपद भूषविले. त्यांनी केलेल्या कामाची शिक्षण क्षेत्रात आजही प्रशंसा केली जाते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते कल्याण पश्चिमेतील कर्णिक रस्त्यावरील प्रधान बंगल्यात राहात होते. निवृत्तीनंतर त्यांनी कल्याण जनता सहकारी बँक, कल्याण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली.