जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स ’ मासिकाने कौतुक केलेल्या ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने आणखी एक नवीन संशोधन केले आहे. अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी नदीखोऱयातून सरडय़ाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात फाऊंडेशनला मोठे यश लाभले आहे. नव्या प्रजातीचा समावेश ‘पॅलोटस’ कुळात केला असून ‘पॅलोटस सिनिक’ असे नामकरण केले आहे. हा शोध ईशान्य हिंदुस्थानातील समृद्ध जैवविविधतेचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे.
हिमालयाच्या पर्वतरांगांमधून वाहणाऱया सुबानसिरी नदीच्या खोऱयामधून सरडय़ाच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात आला. ही प्रजाती समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवरील पर्वतांवरील जंगलांमध्ये आढळून आली. आकार, अंगावरील खवल्यांची रचना, पोटावरील खवल्यांची संख्या व वैशिष्टय़पूर्ण जनुकीय संचावरून ही प्रजाती कुळातील इतरांपेक्षा वेगळी ठरते. सरडयाची ही प्रजाती दिनचर असून मुख्यत्वे झाडांवर वावरते. रात्रीच्या वेळी हे सरडे झाडांच्या छोटय़ा फांद्यावर किंवा खोडांवर विश्रांती घेतात. छोटे कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य आहे, असे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने खूप कमी प्रमाणात अभ्यासला गेला आहे. संशोधनाचे काम करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमध्ये बराच वाव आहे. त्याच अनुषंगाने भविष्यात या परिसरात संशोधन मोहीम सुरू ठेवण्याचे ठाकरे फाऊंडेशनचे नियोजन आहे, असे संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले.
दहा महिन्यांत 20 हून अधिक प्रजातींचा शोध
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने गेल्या दहा महिन्यांत पाली, सापसुरळी, सरडा इत्यादी 20 हून अधिक प्रजातींचा शोध लावला आहे. एप्रिलमध्ये गोल बुबुळे असलेल्या पालींच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावला होता. जगप्रसिद्ध ‘पर्ह्ब्स’ मासिकाने त्याची दखल घेतली होती
तेजस ठाकरे यांच्यासह इतर संशोधकांना यश
संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक हर्षिल पटेल, तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर व ईशान अगरवाल तसेच वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी बेंगलोरचे संशोधक चिंतन शेठ यांनी सहभाग घेतला. नवीन ड्रगन सरडय़ाचा शोध हे या टीमचे मोठे यश मानले जात आहे.