सत्तेत असूनही आरक्षण न देऊन मराठय़ांचे वाटोळे करणाऱया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मराठय़ांना डिवचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम 17 जातींचा समावेश ओबीसीत केला, पण मराठय़ांना आरक्षण दिले नाही. तेव्हाच आम्हाला लक्षात आले की हा माणूस मराठय़ांना आरक्षण देणार नाही. अखेर त्यांच्या पोटात जे होते, ते आता बाहेर आले आहे. ओबीसींमध्ये मराठय़ांशिवाय इतर जातींचा समावेश करून फडणवीस यांनी आम्ही मराठय़ांना मोजत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. आजपर्यंत मराठय़ांना आरक्षण द्यायचे की नाही, हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता, मात्र आता त्यांना मतं द्यायची की नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे, असे जरांगे म्हणाले.
ज्या मराठय़ांनी सत्तेवर बसवले त्याच मराठय़ांच्या पोरांचे आयुष्य बेचिराख कसे करता येईल, यासाठी फडणवीस यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर मराठय़ांच्या विरोधात केला. सरकार आपल्याला आरक्षण देईल अशी अपेक्षा मराठा समाजातील गोरगरीब जनतेला होती, मात्र आता ती अपेक्षा पह्ल ठरली, असे जरांगे म्हणाले.
मराठय़ांच्या पोरांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, कारण मराठा समाजातील पोरं मोठी झाली तर आपले काय होईल अशी फडणवीस यांना भीती वाटते. मराठय़ांची पोरं आरक्षणापासून तसेच नोकऱयांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिली पाहिजेत, भिकारी झाली पाहिजेत असे वचन फडणवीस यांनी घेतले होते. त्यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठय़ांच्या विरोधात अनेक षड्यंत्रे रचली, असा आरोपही जरांगे यांनी केला.