ईव्हीएममधील घोटाळय़ाबाबतच्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, सर्व तक्रारी निरर्थक असल्याचे निवडणूक आयुक्त म्हणाले. अजून किती वेळा आम्ही या सगळय़ा गोष्टी सांगायच्या, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. पेजरनेही स्फोट घडवून आणला जाऊ शकतो तर मग ईव्हीएम हॅक का करू शकत नाही, असा सवाल केला असता, अरे बाबा पेजर कनेक्टेड असतात, ईव्हीएम कनेक्टेड नसतात असे उत्तर निवडणूक आयुक्तांनी दिले. त्याचबरोबर ईव्हीएमची पहिल्या पातळीवरची तपासणी मतदानाच्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी होते. आमच्याकडे ईव्हीएमबाबत 20 तक्रारी आल्या आहेत. प्रत्येक तक्रारींचे आम्ही तथ्य तपासून त्याआधारे स्वतंत्र उत्तर देऊ. प्रत्येक उमेदवाराला माहिती देऊ. जर उमेदवार आमच्याकडे माहिती मागत आहेत तर ती देणे हे आमचे काम आहे. प्रत्येक उमेदवाराला लेखी उत्तर देऊ असे निवडणूक आयुक्त म्हणाले.
अशी असेल ईव्हीएम तपासणीची प्रक्रिया
फर्स्ट लेव्हल चेकिंग, रँडमायझेशन, सेपंड रँडमायझेशन, स्टोरेजमध्ये ठेवणे, स्टोरेजमधून बाहेर काढणे, कमिशनिंग करणे, त्यानंतर पुन्हा स्टोरेजमध्ये ठेवणे, त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेसाठी नेणे, मतदान केंद्रावर पोहोचवणे, तिथे दिवसभर मतदान करून घेणे, त्यानंतर सील करणे, पुन्हा स्टोरेजमध्ये ठेवणे, पुन्हा मोजणीच्या वेळी बाहेर काढणे या प्रत्येक वेळी राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतील, असे निवडणूक आयुक्त म्हणाले.
बॅटरीचा वापर एकदाच
मतदान यंत्रांमधील बॅटरी एकदाच वापरता येते, असे निवडणूक आयुक्त म्हणाले. ही बॅटरी एकदाच वापरता येण्यासारखी आहे. एकदा टाकली की ती पाच ते सहा दिवस चालते. बॅटरी सुरू झाल्यानंतर किती टक्के आहे आणि किती प्रमाणात वापरली जाते या दोन्ही गोष्टी दिसतात, अशी सुविधा आम्ही बॅटरीत दिली आहे. त्यामुळे 7.4 ते 8 व्होल्टेजदरम्यान वापर असेल तर ती सामन्य परिस्थिती आहे. कमिशनिंगवेळी मॉक पोल होते. मतदान केंद्रावरही मॉक पोल होते. मतदानाची संख्या कमी अधिक असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बॅटरीची टक्केवारी वेगवेगळी दिसू शकते. जिथे व्होल्टेज 7.4 च्या खाली येईल, तेव्हा तिथे अलर्ट यायला सुरुवात होईल. 5.8 वर व्होल्टेज येईल तेव्हा बॅटरी अलर्ट देईल की आता हे बंद होऊ शकेल, त्यामुळे बॅटरी बदला असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
बॅटऱ्यांवर उमेदवारांच्या सह्या घेतल्या जातात
निवडणूक आयुक्तांनी मतदान यंत्रामध्ये टाकण्यात येणाऱ्या बॅटरीबाबत विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. मशीनमध्ये कमिशनिंग होते तेव्हा त्यात बॅटरी टाकली जाते. मतदानाच्या 5 ते 6 दिवसआधी कमिशनिंग होते. त्या दिवशी मशीनमध्ये निवडणूक चिन्हे टाकली जातात. त्याच दिवशी मशीनमध्ये नवीन बॅटरी टाकली जाते. सील केल्यानंतर त्या बॅटरीवरही उमेदवारांच्या सह्या घेतल्या जातात. कमिशनिंगनंतर उमेदवारांच्या समोर स्ट्राँगरूममध्ये त्या मशीन जातात. त्या डबल लॉक होतात. या बॅटऱ्यांना तीन स्तरांची सुरक्षा असते. निरीक्षक असतात. मत मोजणीच्या दिवशी मशीन बाहेर काढल्या जातात तिथेही पुन्हा सर्व प्रक्रिया होते. त्या सगळय़ा प्रक्रियेचे चित्रीकरण होते. त्यानंतर स्थानिक निवडणूक अधिकारी सोबत असतात. तिथेही उमेदवारांचे प्रतिनिधी सोबत असतात. त्या मशीनचे क्रमांकही सगळय़ांना दिले जातात, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.