हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हटविण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. आगामी ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम कोणत्याही प्रकारे लागू होणार नाही, अशी नोटीस ‘बीसीसीआय’कडून सर्व सलग्न राज्य क्रिकेट संघटनांना पाठविण्यात आली आहे. मात्र, ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल-2025मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम हा कायम असणार आहे, असेही ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.
‘बीसीसीआय’ने राज्यातील क्रिकेट संघटनांना पाठविलेल्या नोटिशीमध्ये लिहिले आहे की, ‘बीसीसीआय’ने चालू देशाअंतर्गत हंगामातील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमाचा वापर सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेत करण्यात आला होता. यानंतर ‘आयपीएल’मध्येही या नियमाचा वापर करण्यात आला. मात्र, आता सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेतच ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम लागू न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम
‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमानुसार, नाणेफेकीनंतर प्रत्येक संघाला त्यांच्या ‘प्लेइंग इलेव्हन’व्यतिरिक्त जास्तीत जास्त पाच पर्यायी खेळाडूंची नावे देण्याची परवानगी आहे. खेळादरम्यान कोणत्याही वेळी त्यापैकी एका खेळाडूला मैदानावर उतरविले जाते. हा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही खेळाडूच्या जागेवर खेळू शकतो.