पहिल्या कसोटीवर पावसाचीच फिल्डिंग, न्यूझीलंडविरुद्धच्या ‘कसोटी’ साठी हिंदुस्थान सज्ज

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अलीकडेच बांगलादेशला लोळवून कसोटी मालिकेत निर्भेळ यश संपादन केले होते. आता उद्यापासून रोहित सेनेच्या रडारवर टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ असेल. हिंदुस्थान-न्यूझीलंडदरम्यान उद्यापासून बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला कसोटी क्रिकेट सामना रंगणार आहे. मात्र, कानपूर कसोटीप्रमाणे बंगळुरूवरही पावसानेच फिल्डिंग लावली असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या कसोटीतील पहिले दोन  क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरण्याचीच शक्यता अधिक आहे.

टीम इंडियाचे सराव सत्र पाण्यात

जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्त्यामध्ये अक्वल स्थानी असलेला हिंदुस्थानी संघ आपले सिंहासन आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे हिंदुस्थान दौऱयावर आलेल्या न्यूझीलंडची टीम इंडियाविरुद्ध उद्यापासून ‘कसोटी’ लागणार आहे. मात्र, या कसोटीच्या एक दिवसआधी पावसामुळे हिंदुस्थानी संघाचे सराव सत्र रद्द करावे लागले. हे सराव सत्र सकाळी 9.30 वाजता ठरले होते, पण त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. हिंदुस्थानच्या हवामान खात्याने बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, त्याचा कसोटी सामन्यावर परिणाम होऊ शकतो. कसोटीच्या पहिल्या आणि दुसऱया दिवशी पावसाची 70 ते 90 टक्के शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारेही वाहू शकतात आणि आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. बंगळुरूच्या काही भागांसह कर्नाटक राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी बंगळुरूमध्ये पाऊस पडला. अशा स्थितीत येत्या काही दिवसांत पाऊस असाच सुरू राहिल्यास हा कसोटी सामना अनिर्णित राहू शकतो.

इतिहासात टीम इंडियाच वरचढ

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डोकवल्यास न्यूझीलंडविरुद्धच्या हिंदुस्थानी संघाचा नेहमीच वरचष्मा राहिलेला आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत एकूण 62 कसोटी सामने झाले असून, त्यात टीम इंडियाने 22 आणि न्यूझीलंडने 13 कसोटी जिंकल्या आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडची हिंदुस्थानी भूमीवर परिस्थिती आणखी बिकट आहे. न्यूझीलंडला हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत केवळ दोनच कसोटी सामने जिंकता आलेले आहेत.

कसोटी मालिकेसाठी उभय संघ

n हिंदुस्थानी संघ रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

n न्यूझीलंड संघ डेव्हॉन कॉन्वे, टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, केन विल्यम्सन, मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, मिचेल सॅण्टनर, टिम साऊदी, मॅट हेन्री, जेकब डफी, अजजाब पटेल, विल्यम ओ’रुर्पे.