Maharashtra Election 2024 – विधानसभा निवडणुकीची घोषणा; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकर परिषद घेत तारखांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने घोषणा करताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला बुधवारी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबरला लागणार आहे.

26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार आहेत. यापैकी 4 कोटी 97 लाख पुरुष तर 4 कोटी 66 लाख महिला मतदार आहेत. यात 1.85 कोटी तरुण मतदार आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. तसेच निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे.

असा आहे निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

विधानसभेच्या 288 जागांसाठी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबरला जारी करण्यात येईल. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही 20 नोव्हेंबरला होणार आहे.