विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधींच्या विषयांना मंजुरी देण्याचा सपाटा सुरू आहे. गेल्या सात दिवसांत तिसऱ्यांदा स्थायी समितीची बैठक झाली आहे. विशेष म्हणजे, दसऱ्याच्या दिवशी शासकीय सुट्टी असतानाही ऑटोक्लस्टरमध्ये स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सव्वा ते दीड महिना महापालिकेत कोणत्याही नवीन विकासकामांना मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी महायुतीच्या आमदारांचा प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्यावर प्रचंड दबाव आहे. याच दबावातून आयुक्त सिंह हे फेरनिविदा न मागविता, वाढीव दराने मान्यता देत आहेत.
8, 12 आणि आज तीन दिवस स्थायीच्या झालेल्या बैठकीत गेल्या महिनाभरात सुमारे 800 कोटींच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने 120 कोटींचे संविधान भवन, महाविकास आघाडीने निविदा प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केलेल्या शाळा, स्वच्छतागृहांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठीची वादग्रस्त 61 कोटी 41 लाखांची निविदा, अग्निशमन विभागासाठी फ्लड रेस्क्यू व्हॅन खरेदी, रुग्णालयात विविध उपकरणे खरेदी करणे, 18 माध्यमिक शाळांमधील सीसीटीव्ही यंत्रणांची देखभाल-दुरुस्ती, ‘पॅलेडियन’ या संस्थेला सल्लागार म्हणून तीन वर्षांसाठी साडेसतरा कोटी रुपये, शहरात धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी 19 कोटी 50 लाख रुपयांची विविध भागांत रस्तेबांधणी यांसह विविध विषयांना आयुक्त सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
प्रशासकीय राजवटीत कोट्यवधींची ‘उड्डाणे’
■ महापालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. गेल्या अडीच वर्षांत शहराच्या विविध भागांतील सुमारे साडेतीन हजार कोटीपेक्षा जास्त विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत कोटीच्या कोटी ‘उड्डाणे’ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत जास्तीत-जास्त विषय मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. शेवटच्या बैठकीत आपला विषय मार्गी लागावा, यासाठी ठेकेदारांनी आणि आपल्या कामांसाठी नागरिकांनीही महापालिका भवनात मोठी गर्दी केली होती.
30 मिनिटांत 150 कोटींच्या कामांना मंजुरी
■ स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून ते मंजूर करणे अपेक्षित आहे; परंतु सोमवारी सायंकाळी साडेचार ते पाच या वेळेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जास्त चर्चा न करताच 150 कोटींच्या विषयांना अवघ्या 30 मिनिटांत आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.