इस्त्रालच्या सैन्य तळावर हिजबुल्लाहचा मोठा हल्ला; 4 सैनिक ठार तर, 58 जखमी

इस्रायल आणि लेबनॉनमधल्या हिजबुल्लाह या संघटनेमधला संघर्ष पेटला आहे. हिजबुल्लाहने इस्त्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. ज्यामध्ये 4 इस्त्रायली सैनिक ठार झाले असून 58 सैनिक जखमी झाले आहेत. हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. उत्तर-मध्य इस्रायलमधील बिन्यामिनाजवळील सैन्य तळावर काही ड्रोन स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7 च्या सुमारास सैनिक जेवायला एकत्र जमले असताना डायनिंग हॉलवर हा हल्ला करण्यात आला. यात आणखी सात सैनिक गंभीर जखमी झाल्याचे IDF या इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले आहे.

इस्त्रायली सेनेचे प्रवक्ते रियर एडमिरल डॅनियल हगरी म्हणाले की, या हल्ल्याचा तपास केला जात आहे. कारण कोणताही ड्रोन इस्त्रायली हवाई हद्दीत कोणत्याही इशाऱ्याशिवाय कसा येऊ शकतो? याचा तपास केला जात आहे. मीडिया रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आले की, ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी इस्त्रायली आर्मी चीफ ऑफ स्टाफ हर्झी हवेली तिथे उपस्थित होते. हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवर निशाणा साधला आहे.

एका ठिकाणी मोठ्या संख्येने सैनिक उपस्थित असताना तळावर हल्ला करणाऱ्या हिजबुल्लाहच्या गुप्तचर यंत्रणेचे हे मोठे यश मानले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक तपासानुसार, हिजबुल्लाहने प्रक्षेपित केलेले दोन्ही ड्रोन समुद्रातून इस्रायलच्या हवाई हद्दीत घुसले होते. दोन्ही इराणी मिरसाद ड्रोन होते. या ड्रोनची रेंज 120 किलोमीटर, कमाल वेग 370 किलोमीटर प्रति तास, 40 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इराण आता रशियन उपग्रहाची मदत घेत आहे.