मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेवरून महाराष्ट्र आणि देशातील राजकारण तापले असताना आता तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या एका वृत्ताचा दाखला देत लॉरेन्स बिष्णोई टोळी संदर्भात ट्विट करत मोठा धमाका केला आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीला संरक्षण कोण देतंय? असा सवाल उपस्थित करत साकेत गोखले यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे.
कॅनडाच्या अधिकाऱ्यांची आणि हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल यांची गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये भेट झाली. या भेटीत कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अजित डोवाल यांना कागदपत्रे दिली. यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा कॅनडात हत्या आणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये सामील असल्याचा दावा कॅनडाने केला, असे वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटल्याचे साकेत गोखले यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. लॉरेन्स बिष्णोईवरून हिंदुस्थान-कॅनडात खडाजंगी झाल्याचा दावाही साकेत गोखले यांनी केला आहे.
– .
According to Washington Post, Canadian officials met NSA Ajit Doval in Singapore last week & gave… pic.twitter.com/6hlqbLW3e1
— Saket Gokhale MP (@SaketGokhale) October 15, 2024
साकेत गोखले यांनी काही प्रश्न उस्थित केले आहे. हे प्रश्न पुढील प्रमाणे –
> गुजरातमध्ये तुरुंगात असूनही लॉरेन्स बिष्णोई हा इतका पावरफुल कसा?
> लॉरेन्स बिष्णोई याला इतर प्रकरणात चौकशीसाठी सोपवण्यास किंवा गुजरात बाहेरच्या तुरुंगात पाठवण्यास मोदी सरकार विरोध का करतंय?
> तुरुंगात असूनही लॉरेन्स बिष्णोई हा हिंदुस्थानात आणि विदेशात खंडणी आणि हत्येच्या घटना कशा काय घडवून आणू शकतो?
> लॉरेन्स बिष्णोईला अभय कोण देतंय आणि तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो?
कॅनडाच्या दाव्यांना उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सरकाराने चांगलीच तयारी दाखवली आहे. पण सिद्धू मूसवेला, बाबा सिद्दिकी, दिल्लीतील जिम मालक आणि इतर अनेकांच्या हत्येत लॉरेन्स बिष्णोईचा हात आहे. यामुळे लॉरेन्स बिष्णोई हा गुन्हेगार म्हणून तुरुंगात आहे की मोदी सरकार त्याचा वापर करत आहेत? की गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईला जाणूनबुजून मोकळीक दिलेली आहे? असा प्रश्न साकेत गोखले यांनी केला आहे.
कॅनडाने काय दावे केले आहेत, ते फार काही महत्त्वाचं नाही. पण लॉरेन्स बिष्णोईची नेमकी भूमिका आणि स्टेटस काय? मोदी सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी साकेत गोखले यांनी केली आहे.