लग्नपत्रिकेवरील तारखेचा घोळ पोहोचला कोर्टात, हायकोर्टाने वधू-वराला दिला दिलासा

लग्नाची तारीख ठरली. पत्रिका छापल्या. पण विवाह ठरलेल्या तारखेवर न होता सहा महिन्यांनी झाला. मॅरेज सर्टिफिकेटवर लग्नपत्रिकेवरील तारीख नमूद झाली. हा घोळ दुरुस्त करण्यासाठी वराने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने या जोडप्याला दिलासा देत मॅरेज सर्टिफिकेटवर अचूक तारीख नमूद करण्याची मुभा दिली.

हे जोडपे पुणे येथील आहे. मॅरेज सर्टिफिकेटवर चुकीची तारीख नमूद झाली यात पुणे महापालिकेचा दोष नाही. लग्नपत्रिकेवरील तारखेनुसार प्रशासनाने मॅरेज सर्टिफिकेट जारी केले, अशी कबुली या जोडप्याने न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर दिली. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने या जोडप्याला चूक सुधारण्यासाठी संधी दिली.

मे महिन्याऐवजी नोव्हेंबरमध्ये झाला विवाह

या जोडप्याचा विवाह 21 मे 2023 रोजी होणार होता. वधू-वर दोघेही परदेशात होते. त्या दिवशी विवाह झालाच नाही. 5 नोव्हेंबर 2023 रोजी वधू भारतात आली. 6 नोव्हेंबरला या जोडप्याचा विवाह झाला. त्यांनी मॅरेज सर्टिफिकेटसाठी रीतसर अर्ज केला. पालिकेकडून त्यांना मॅरेज सर्टिफिकेट मिळाले. त्यावर तारीख चुकीची असल्याने ती बदलण्यासाठी त्यांनी याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने मंजूर केली.

व्हिसासाठी येत होती अडचण

विवाहानंतर पत्नी परदेशात गेली. पतीलाही परदेशात शिक्षणासाठी जायचे आहे. व्हिसासाठी त्याने अर्ज केला. मॅरेज सर्टिफिकेटवर चुकीची तारीख नोंद झाली. त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचणीत येत होत्या. पालिकेने तारखेत बदल करण्यास नकार दिला होता. खंडपीठाने मॅरेज सर्टिफिकेटसाठी अर्ज करण्यास या जोडप्याला परवानगी दिली. पालिकेने या अर्जानुसार नवीन मॅरेज सर्टिफिकेट द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले.