>> आकाश महालपुरे
‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जण जाणतो. मग आजच्या तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठीच हा लेखप्रपंचाचा अट्टाहास. पुस्तके, आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने मनुष्य हा सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच; परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवरसुद्धा वाचनाचा प्रचंड प्रभाव पडतो. मागच्या पिढीपेक्षा आताच्या तरुण पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी सर्वच स्तरांवर वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वाचनाचे वेड निर्माण करायचे असेल तर तशी परिस्थिती त्या तरुण-मुलांच्या अवती-भवती निर्माण होणं गरजेचं आहे. मात्र आजच्या काळात वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे आणि मोबाईलच्या आहारी जाऊन इंटरनेटवर बराच वेळ घालवत आहे. कारण त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती नाहीशी होत आहे. खरं तर तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे, जीवनाचे सार समजावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज आज सर्वच स्तरांवर निर्माण झाली आहे. लोकमान्य टिळकांनी तर ‘प्रत्येक मानवी रूपाला जर उत्तम व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर प्रत्येकाने वाचन करा’ असा संदेश दिला.आणि धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन हे कराच, असाही उपदेश त्यांनी दिला. मात्र आजच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या दुनियेत गुंतल्यामुळे लोकमान्य टिळकांच्या उपदेशाकडे नव्या पिढीचे लक्ष नाही.
पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे क्षितिज निर्माण करणारे विजयी साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात आणि विजयाच्या वाटेवर घेऊन जातात. पुस्तकांमुळे ढासळलेल्या मनाला धीर मिळतो. वाचन संस्कृती जपण्याशिवाय मानवजातीला पर्याय नाही. वाचनामुळे माणूस हा प्रगल्भ होत असतो. नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल. आजच्या तरुण पिढीने रिकामे छंद जोपासण्यापेक्षा पुस्तक वाचन हा फुकटचा छंद शंभर टक्के जोपासला पाहिजे. तसे पाहिले तर साक्षर तरुणांपैकी 61 टक्के जण त्यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत पुरेपूर समाधानी आहेत. मात्र वाचनाचा छंद असलेल्या तरुणांमध्ये समाधानाचे प्रमाण 70 टक्के, तर कमी वाचन करणाऱयांमध्ये हेच प्रमाण 58 टक्क्यांपर्यंत आहे.
वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती अधिक प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेला वाट सापडते. सहृदयता, दुसऱयाच्या दुःखाची जाणीव, संवेदनशील मन यांस आपोआपच खतपाणी मिळते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त होते.